तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात सोमवारी आजी व माजी खासदारांमध्ये शहरातील विकासकामांच्या श्रेयावरून जोरदार खडाजंगी झाली. यावेळी काही कार्यकर्ते खासदार विशाल पाटील यांच्याकडे धावून जाण्याचा प्रकारही पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या साक्षीने घडला. तासगाव नगरपालिकेसाठी १३ कोटी रुपयांचा खर्च करून अद्ययावत इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे आज पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. पाटील यांनी तासगावच्या बाह्यवळण रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १७३ कोटींचा निधी मंजूर केल्याचे सांगितले. हा निधी स्थानिक आमदारांच्या पाठपुराव्याने मंजूर करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले असल्याचा उल्लेख खासदारांनी आपल्या भाषणात केला. यानंतर भाषणास उभारलेल्या माजी खासदार पाटील यांनी खासदारांच्या उल्लेखाला जोरदार आक्षेप घेत विकास कामासाठी निधी कसा मंजूर करायचा हे नुकत्याच खासदार झालेल्यांनी सांगू नये असे म्हणताच, खासदार पाटील यांनीही मी सभेचे संकेत पाळत वक्तव्य केले असून जे गडकरी यांनी सांगितले त्याचाच उल्लेख केला असल्याचे सांगत माजी खासदारांचा आक्षेप फेटाळून लावण्यासाठी ते उभे राहिले. यामुळे वाद उफाळून आला. दोघेही एकमेकांकडे हातवारे करत इशारे देत असल्याचे पाहताच सभागृहात उपस्थित असलेले कार्यकर्तेही व्यासपीठावर धावले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत खासदार पाटील यांच्याभोवती संरक्षण कडे केले.
दरम्यान, तासगावच्या बाह्यवळण रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी निधी मंजुरीची घोषणा केल्यानंतर तासगावमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात गडकरींचे अभिनंदन करणारे फलक लावले होते. यावरून हा श्रेयवाद धुमसत होता. आज नगरपालिका इमारत उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी खा. पाटील यांनी उल्लेख करताच हा श्रेयवाद उफाळून आला.