कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा टक्केवारीने किती बरबटलेली आहे याचा उलघडा कोल्हापूर महापालिकेच्या नोंदणीकृत कंत्राटदारानेच केला. त्यामुळे कोल्हापूर महापालिका किती खोलवर भ्रष्टाचारांमध्ये रुतली गेली आहे याचाच भांडाफोड कंत्राटदार श्रीप्रसाद वराळेनं केलेल्या लेखी आरोपातून झाला आहे. श्रीप्रसाद वराळेनं शुक्रवारी महापालिकेमधील क्लार्कपासून ते अतिरिक्त आयुक्तांपर्यंत टक्केवारी देण्यासाठी किती पैसे मोजले याचा सनसनाटी खुलासा केला. त्यामुळे या महापालिकेच्या नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांची पैशाची भूक आहे तरी किती असाच प्रश्न उपस्थित झाला.
वराळेविरोधात गुन्हा दाखल, टक्केवारी घेतली त्यांनीच फिर्याद दिली
कोल्हापूर महापालिकेची ड्रेनेच कामात खोटी बिले सादर करून 72 लाख उचलून फसवणुकीचा आरोप केल्याचा ठपका ठेवत कोल्हापूर महापालिकेकडून श्रीप्रसाद वराळे विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद कोल्हापूर महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी दाखल केली आहे. मात्र यामधील विरोधाभास म्हणजे याच प्रज्ञा गायकवाड यांना टक्केवारीच्या रूपामध्ये 1 लाख वीस हजार रुपये दिल्याचा आरोप श्रीप्रसाद वराळेनं केला आहे. इतकेच नव्हे तर गुगल पेचा स्क्रीनशॉट सुद्धा प्रज्ञा गायकवाड यांना दिलेल्या टक्केवारीचा शेअर केला आहे. त्यामुळे ज्यांनी टक्केवारी घेतली त्याच या प्रकरणांमध्ये फिर्यादी असल्याने याची सुद्धा उलटसुलट चर्चा रंगली आहे. वराळेविरोधात ड्रेनेज कामात खोटी कागदपत्रे दाखल करणे, शहर, उपशहर अभियंतांची बनावट सही, शिक्के मारून मजकुरात खाडाखोड करून ही रक्कम आर्थिक फायद्यासाठी वापरून महापालिकेचे फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. ही फसवणूक एक ते 23 डिसेंबर 2024 च्या दरम्यान घडली असल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. या संदर्भात मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याशी शनिवारी एबीपी माझाने संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला, पण होऊ शकला नाही.
प्रशासकांकडून संबंधित कारणे दाखवा नोटीस
दुसरीकडे, मनपा प्रशासकांनी कसबा बावडा पूर्व बाजू अंतर्गत जाधव घर ते रेणुसे, रेडेकर, बडबडे मळ्यापर्यंत ड्रेनेज पाईप टाकणे या विकास कामाचे धावते देयक क्रमांक 05 चे कामी फेरफार करुन मेजरमेंट बुकमध्ये तसेच एमबी सोबत सादर केलेल्या देयक फॉर्मवरील पदनामावर करण्यात आलेल्या बोगस स्वाक्षरी करुन ठेकेदारास बिल अदा झाल्याच्या अनुषंगाने संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करणेचे व ब्लॅकलिस्टचे आदेश दिले आहेत, दरम्यान, वराळे यांनी केलेल्या आरोपानंतर अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, तत्कालीन वरिष्ठ लेखापरिक्षक सुनिल चव्हाण, श्रीमती वर्षा परिट, लेखापरिक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक श्रीमती जयश्री हंकारे, पवडी विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ लिपीक प्रभाकर नाईक यांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे. आपल्या विरुध्द प्रशासकीय कारवाई का सुरु करणेत येऊ नये? याबाबत लेखी खुलासा सोमवार दिनांक 28/07/2025 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत करण्यास सांगितला आहे. खुलासा या मुदतीत सादर केला नाही तर पुढील प्रशासकीय कारवाई करणेत येईल याची गंभीर नोंद घ्यावी अशा स्वरुपाच्या नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणामध्ये यापूर्वी तत्कालीन शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, तत्कालीन उप-शहर अभियंता रमेश कांबळे, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंटंट बळवंत सुर्यवंशी यांना नोटीसा दिल्या असून त्यांचाही खुलासा मागविण्यात आला आहे. या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होण्यासाठी या प्रकरणाशी संबंधीत पवडी अकौंट व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांची अन्य विभागामध्ये बदली करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत.
चौकशी समिती नियुक्त
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मीयांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती केली आहे. या चौकशी समितीला या सर्व प्रकरणाचा अहवाल सात दिसाचे आत देण्याचे निर्देश प्रशासकांनी दिले आहेत. यामध्ये जे जे अधिकारी व कर्मचारी कागदपत्राच्या व पुराव्याच्या आधारे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.