“मी वर्गात बोलावत नाही तोपर्यंत उठाबशा काढा”- वसईत शिक्षिकेची विद्यार्थिनींना अमानुष शिक्षा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेतील चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षिकेने केलेल्या शिक्षेमुळे चार दिवसापासून विद्यार्थिनी त्रासात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक पातळीवरून तीव्र संताप व्यक्त होत असून शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या वसई तालुक्यातील भाताणे – बेलवाडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा येथे शिक्षण घेणाऱ्या चौथी इयत्तेतील विद्यार्थीनींनी गृहपाठ केला नसल्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थिनींना “मी वर्गात बोलावत नाही तोपर्यंत उठाबशा काढा” असे म्हणत शिक्षा केली. यांनतर विद्यार्थीनींनी शंभर पेक्षा जास्त उठाबशा काढाव्या लागल्याची माहिती एका विद्यार्थिनीने दिली. यामुळे तीन ते चार विद्यार्थिनींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असून तीन विद्यार्थिनींचे पाय जास्त प्रमाणात सुजल्यामुळे त्यांना चालण्यास जास्त त्रास होत असल्याचे समोर आले आहे.

बुधवार २ एप्रिल रोजी शाळेच्या वेळेत विद्यार्थिनींना शिक्षा देण्यात आली. जास्त प्रमाणात उठाबशा काढल्यामुळे संध्याकाळ पर्यंत विद्यार्थिनींच्या पायांना जास्त प्रमाणात सूज येऊन रात्रभर त्यांना त्रास सहन करावा लागला. दुसऱ्या दिवशी मुलींना त्रास सहन होत नसल्यामुळे शिक्षक वृंदाने त्यांना दवाखान्यात नेले असता त्याठिकाणी उपस्थित असलेले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनतर त्यांनी मुलींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराची माहिती दिली. याविषयी कुटुंबीयांनी शिक्षिकेला संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात येत आहे.

यांनतर कुटुंबीयांनी शनिवारी शाळेत जाऊन मुलींची चौकशी केली असता मुलींना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यांनतर कुटुंबीयांनी मुलींना घरी आणले असून त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार करण्याचा कुटुंबीयांचा प्रयत्न आहे. घटनेला चार दिवस उलटून देखील विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असून त्यांना चालण्यासाठी अडचण होत असल्यामुळे कुटुंबीयांना त्यांची काळजी घ्यावी लागत आहे. मुलींना अमानुष शिक्षा दिल्यामुळे संबंधीत शिक्षिकेला देखील कठोर शिक्षा करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

स्थलांतर करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांतील मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी शासनाने आदिवासी मुलांसाठी शासकीय आश्रमशाळा उभारल्या आहेत. या शाळांमध्ये राहणाऱ्या मुलांना योग्य आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र स्थानिक पातळीवर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत. वसई तालुक्यातील बेलवाडी आश्रमशाळेतील प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून याप्रकरणी नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्ही वीटभट्टीवर काम करून आमचा उदरनिर्वाह करतो आम्हाला शिक्षण घेणे शक्य झाले नाही त्यामुळे आमच्या मुलीला शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही मुलीला शासकीय यंत्रणेच्या भरोश्यावर शाळेत ठेवले मात्र शिक्षीकेकडून आमच्या मुलीला अमानुष शिक्षा देण्यात आली. या शिक्षिकेवर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.संदीप तल्हा, पालक विद्यार्थीनींनी गृहपाठ केला नसल्यामुळे त्यांना शिक्षा देण्यात आल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयामार्फत एक समूह पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून योग्य चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी डहाणू


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *