गेल्या सहा महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा मोठी युद्ध थांबवली आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात ट्रम्प यांनी मध्यस्ती करून ते थांबवलं. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा अशी मागणी व्हाईट हाऊसने केली आहे. व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी ही मागणी केली आहे.
व्हाईट हाऊसची मागणी काय?
व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिवांनी एक पत्रकार परिषद घेऊन ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान, इराण आणि इस्त्रायल यांच्यासह सहा देशांमध्ये सुरू असलेले युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं. या सगळ्याचा अर्थ म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सहा महिन्याच्या कार्यकाळात महिन्याला सरासरी एक शांतता करार केला किंवा युद्धविराम घडवून आणला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना आता शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा अशी मागमी व्हाईट हाऊसकडून करण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी कोणती युद्धे थांबवल्याचा दावा केला?
भारत आणि पाकिस्तान
थाललंड आणि कंबोडिया
इस्त्रायल आणि इराण
रवांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो
सर्बिया आणि कोसोवो
इजिप्त आणि इथिओपिया
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवल्याचा दावा
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानमध्ये शिरून तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्लेही निकामी केले होते. या दोन्ही देशांमध्ये मोठं युद्ध होणार अशी शक्यता असताना दोन्ही देशांनी अचानक युद्धबंदीची घोषणा केली.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर ही युद्धबंदी करण्यात आल्याचं भारताने स्पष्ट केलं. परंतु, भारत आणि पाकिस्तान या दोन अणवस्त्रधारी देशांमध्ये आपणच मध्यस्ती केली आणि युद्ध थांबवलं असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. हा दावा त्यांनी आतापर्यंत अनेकदा केला आहे.
ट्रम्प यांची पाकिस्तानवर मेहरबानी
डोनाल्ड ट्रम्पनी पाकिस्तानवर मेहरबानी करत भारताला डिवचल्याचं दिसून आलं. भारतावर 25 टक्के टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानच्या मालावर फक्त 19 टक्क्यांचा टॅरिफ लावला आहे. ट्रम्पकडून पाकिस्तानवर 29 टक्क्यांऐवजी 19 टक्के टॅरिफ लावला. त्यामुळे भारत, बांग्लादेश, व्हिएतनामच्या वस्त्रोद्योगाला फटका बसणार आहे.