नैराश्यामुळे खरच वजन वाढतं का ?घ्या जाणून

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

‘शरीराचे वजन वाढण्याची कारणे कोणती?’ याचा विचार करताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते की, ज्या व्यक्ती मानसिक ताणतणावाचे जीवन जगतात त्यांची शरीरे अधिक वजनदार असतात. शास्त्रज्ञांनी स्थूलतेच्या कारणांवर संशोधन करताना असे पाहिले की ज्यांची-ज्यांची शरीरे स्थूल, वजनदार, चरबीयुक्त होती; त्या व्यक्ती अतिशय ताणयुक्त जीवन जगत होत्या, नैराश्याने ग्रस्त होत्या. आता ‘ताणयुक्त जीवनाचा-नैराश्याचा शरीर स्थूल होण्याशी संबंध काय?’ असा प्रश्न पडला असेल तुम्हाला.

स्थूल होण्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे अति उष्मांक देणाऱ्या ( हाय कॅलरीक) आहाराचे अधिक प्रमाणात सेवन तर दुसरीकडे परिश्रमाचा-चलनवलनाचा अभाव. मात्र या दोन कारणांशिवाय नैराश्य हेसुद्धा स्थूलतेचे कारण होऊ शकते. आयुष्यात निराशावादी असणाऱ्या व्यक्तींना वजन वाढण्याचा धोका तुलनेने जास्त असतो; असा शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला आहे. एखादा माणूस जीवनातल्या एका विशिष्ट टप्प्यावर नकारात्मक भूमिका घेतो; तर कधी-कधी काही माणसांचा जीवनाकडे पाहाण्याचा एकंदरच दृष्टीकोन निराशवादी असतो. अशा दोन्ही प्रकारच्या माणसांना अति खाण्याचा रोग( ? ) जडतो. खरं तर हा रोग नसतो; तर आयुष्यात काय करायचे हे न कळल्याने त्यांचे लक्ष खाण्याकडे वळते. अति खाण्याचा हा धोका स्थूलता या रोगाचे कारण बनतो. तुम्ही नीट निरीक्षण कराल तर लक्षात येईल की नकारात्मक किंवा पराभवात्मक भूमिकेची सवय जडलेल्या व्यक्ती हळूहळू मानसिक दृष्ट्या निराश होतात व माणसांपासून दूर राहू लागतात. माणूस घाण्या बनलेल्या त्या व्यक्ती एकदा एकलकोंड्या झाल्या की चलनवलन-परिश्रम जवळजवळ थांबते आणि ‘अन्न’ हाच त्यांचा सोबती बनतो. अन्न सेवनानंतर त्यांना ऊर्जा मिळते व थोडा धीर येतो आणि आनंदाचा आभास होतो. आनंदाचा हा आभासच त्या व्यक्तीस पुन्हापुन्हा अन्नसेवनास प्रवृत्त करतो. त्यातही अन्नसेवन करताना मनाला तृप्त करणारा चरबीयुक्त आहार खाणे त्यांना अधिक आवडते.

दुसरीकडे तणावयुक्त जीवन जगणाऱ्या माणसांच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल या हार्मोनचे स्त्रवण अधिक प्रमाणात होते व त्यांच्या शरीराच्या विविध चयापचया-क्रियांचा वेग (मेटाबोलिक रेट) मंदावतो. मेटाबोलिक रेट मंदावल्यामुळे शरीरातल्या विविध चयापचय-क्रियांसाठी लागणारी ऊर्जा फारशी खर्च होत नाही किंवा इतरांच्या तुलनेत कमी प्रमाणात खर्च होते. असेही दिसून येते की या मंडळींकडून रोजची कामे, दैनंदिन व्यवहारासाठी लागणाऱ्या अनेक क्रियासुद्धा मंदगतीने होतात. याशिवाय मानसिक ताणाला तोंड देणाऱ्या व्यक्ती या एकाच जागेवर बसणे पसंत करतात, त्यांना क्रियाशील-उत्साही जीवन आवडेनासे होते, त्यांच्या शरीराला व्यायाम तर अजिबात घडत नाही. अतिअन्नसेवन व परिश्रमाचा अभाव यांचा परिणाम म्हणजे त्यांचे शरीर दिवसेंदिवस स्थूल – चरबीयुक्त व वजनदार बनत जाते. अर्थात तुम्हाला ताणयुक्त आयुष्य जगावे लागतेय म्हणून तुम्ही व्यायाम-हालचाली करु नयेत, सतत चरबीयुक्त आहार घ्यावा असा स्वतःला सोयीस्कर अर्थ मात्र यामधून काढू नका.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *