डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) ही एक गंभीर परंतु टाळता येण्याजोगा रक्तवाहिन्यांचा एक विकार आहे. ज्यामुळे जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. डीप वेन थ्रॉम्बोसिस (डीव्हीटी) ही एक अशी गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. ज्यात शरीरात खोलवर असलेल्या नसांमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होते. अशा प्रकारची गुठळी सामान्यतः मांडी किंवा पायामध्ये तयार होते; मात्र शरीराच्या इतर भागांतदेखील या तयार होऊ शकतात. या गुठळ्या रक्त प्रवाह रोखू शकतात आणि सूज किंवा वेदना निर्माण करू शकतात. उपचार न केल्यास, गुठळी फुटू शकते आणि फुफ्फुसांमध्ये जाऊ शकते, ज्यामुळे पल्मोनरी एम्बोलिझम (PE) होऊ शकते, जी एक गंभीर गुंतागुंत आहे. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या करणाऱ्या या रोगााची कारण काय? लक्षण कशी ओळखायची? यावर उपचार काय आहेत? हा रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची? हे चेंबूरच्या सुराणा सेठिया रुग्णालयाचे व्हॅस्क्युलर सर्जन आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अशांक बन्सल यांनी सांगितले आहे. (Health)
काय आहेत कारणं?
अनेक घटक डीव्हीटीचा धोका वाढवू शकतात,
दीर्घकाळ बसून राहणे किंवा गतिहीन जीवनशैली
शस्त्रक्रिया, विशेषतः ऑर्थोपेडिक प्रक्रिया
काही वैद्यकीय परिस्थिती, जसे की कर्करोग किंवा रक्त गोठण्याचे विकार
गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरचा काळ
धूम्रपान आणि लठ्ठपणा
गर्भनिरोधक गोळ्या किंवा हार्मोन थेरपीचा वापर
कौटुंबिक इतिहास
डॉ. बन्सल सांगतात की, धूम्रपान आणि लठ्ठपणा सारखे घटक देखील डीव्हीटीचा धोका वाढवू शकतात.
काय लक्षणं आहेत?
एका पायाला सूज (क्वचितच दोन्ही),
वेदना किंवा संवेदनशीलता (बहुतेकदा पोटरीपासून सुरू होते),
प्रभावित भागात उष्णता किंवा लालसरपणा
पायात क्रॅम्पिंग किंवा जडपणा जाणवतो.
निदान
डीव्हीटीचे निदान सामान्यतः डॉपलर अल्ट्रासाऊंड सारख्या इमेजिंग चाचण्यांद्वारे केले जाते, जे रक्तवाहिन्यांमधीव रक्त प्रवाह तपासते. काही प्रकरणांमध्ये, रक्त गोठण्याची उपस्थिती निश्चित करण्यासाठी डी-डायमर रक्त चाचण्या आणि व्हेनोग्राफी वापरली जाऊ शकते. लक्षणांवर आधारित डीव्हीटीचे निदान झाल्यानंतर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. पल्मोनरी एम्बोलिझमसारख्या गंभीर गुंतागुंत रोखण्यासाठी वेळीच निदान करणे गरजेचे आहे.
उपचार
डीव्हीटीवरील उपचारांमध्ये रक्त गोठण्याची क्षमता कमी करणे आणि नवीन गुठळी तयार होण्यापासून रोखणे यावर लक्ष केंद्रित केले जाते:
रक्त पातळ करणारे (अँटीकोआगुलंट्स): रक्त गोठण्याची क्षमता कमी करते.
कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज: पायांमध्ये रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते.
थ्रोम्बोलायटिक्स: गंभीर प्रकरणांमध्ये, रक्त गोठणे कमी करणारी औषधे वापरली जाऊ शकतात.
डॉक्टर शस्त्रक्रिया देखील करू शकतात. म्हणून, थ्रोम्बेक्टॉमी किंवा कॅथेटर-निर्देशित थ्रोम्बोलिसिस सारख्या प्रक्रिया सुचवल्या जाऊ शकतात.
प्रतिबंधात्मक उपाय
शरीर सक्रिय राखा आणि जास्त वेळ बसणे टाळा; दर १ ते २ तासांनी हालचाल करा.
प्रवासादरम्यान योग्य हायड्रेशन सुनिश्चित करा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज घाला.
वजन नियंत्रित राखा आणि धूम्रपान टाळा.
शस्त्रक्रियेनंतर किंवा गर्भधारणेदरम्यान तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा.
तुमच्यासाठी कौटुंबिक इतिहास जाणून घेणे आणि तुमच्या डॉक्टरांशी जोखीम घटकांवर चर्चा करणे गरजेचे आहे.
हेही वाचा: