ब्रोन्कायटिस म्हणजे काय?
ब्रोन्कायटिस झालेल्या रुग्णाच्या श्वसननलिकेत सूज येते. फुप्फुसातून हवा आत आणि बाहेर केली जाते. मात्र त्या श्वसननलिका फुगल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच काही वेळा श्वास घेण्यात अडचणी येतात. यावेळी व्यक्तीला खूप खोकला होतो. तसेच अधिक प्रमाणात कफ पडतो. श्वसनलिका कमजोर होते आणि फुफ्फुस मोठ्या प्रमाणात खराब होतात.
ब्रोन्कायटिसचे एक्युट ब्रोन्कायटिस आणि क्रॉनिक ब्रोन्कायटिस असे दोन प्रकार असतात. एक्युट ब्रोन्कायटिसमध्ये साधारण सर्दी आणि ताप येतो. तसेच कफ झाल्याने छातीत त्रास होतो आणि श्वास घेणंही कठीण होते. तर एक्युट ब्रोन्कायटिसमध्ये थोडासा तापही असतो. एक्युट ब्रोन्कायटिस होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आहे. तर क्रॉनिक ब्रोन्कायटिसमध्ये खोकला आणि कफ होण्याचे प्रमाण अधिक असते. जर योग्य उपचार केले नाही, तर हा आजार बरे होण्यास अनेक महिने लागतात.
ब्रोन्कायटिस लक्षणे काय?
छाती जड होणे आणि दम लागणे
थोडा ताप आणि थंडी
हिरव्या किंवा फिकट पिवळ्या रंगाचा कफ आणि खोकला
कधीकधी कफसह रक्त निघणे.
एक्युट ब्रोन्कायटिसमध्ये सर्दीची सामान्य लक्षणे दिसतात. तसेच रुग्णांना कमी-श्रेणीचा ताप, अंगदुखीही होते. ही लक्षणे एका आठवड्यात बरी होत असली तरी पण खोकला अधिक काळ टिकू शकतो. तर क्रॉनिक ब्रोन्कायटिसमध्ये सतत खोकला लागणे, खोकला अचानक वाढणे आणि तो तीन महिने टिकणे ही लक्षणे रुग्णांना जाणवू शकतात.
ब्रोन्कायटिस मुख्य कारणं काय आहेत?
ब्रोन्कायटिस हा आजार एखाद्या व्हायरसमुळेही होऊ शकतो. जर समजा तुम्हाला ताप, सर्दी असे काही झाले असेल तर त्यानंतरही तुम्हाला ब्रोन्कायटिस हा आजार होऊ शकतो. पण क्रॉनिक ब्रोन्कायटिस हा फुफ्फुसांना त्रासदायक गोष्टींच्या संपर्कात येणे, घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी रसायनांमुळे होणारे परिणाम, कमी प्रतिकारशक्ती किंवा धूम्रपानामुळे होऊ शकतो.
उपचार काय?
ब्रॉन्कायटीस हा आजार थोडा वेगळा असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावे. डॉक्टरांकडून प्रामुख्याने श्वासोच्छवासाचे व्यायाम, ऑक्सिजन थेरेपी, धूम्रपान सोडणे, जास्त द्रवपदार्थ पिणे आणि स्टीम घेणे हे उपाय सुचवले जाते. ज्यामुळे तुम्हाला याचा त्रास कमी होऊ शकतो. त्यासोबतच सावधगिरी म्हणून बाहेर पडताना मास्क घालणे, घरात ह्युमिडिफायर वापरणे, प्रदूषक आणि इरिटंट्सपासून दूर राहणे आणि लस घेणे फायदेचे ठरु शकते.
(Disclaimer – वरील माहिती https://www.myupchar.com/ या वेबसाईटच्या संदर्भांवरून घेण्यात आली आहे.लेखणी बुलंद याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)