सुशांत सिहं राजपूतची माजी मॅनेंजर दिशा सालियन हिच्या मृत्यूवरुन महाराष्ट्र विधीमंडळात गोंधळ झाला होता. त्यातच आता तिचा पाच वर्षांपूर्वीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती लागला आहे. या अहवालात दिशाच्या डोक्यावर गंभीर इजा असून शरीरावर गंभीर जखमा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पण दिशावर कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
दिशाच्या वडिलांची नव्याने याचिका
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत या प्रकरणी नव्याने याचिका दाखल केली आहे. सामुदायिक बलात्कार केल्यानंतर दिशाची हत्या करण्यात आली आहे असा आरोप सतीश सालियन यांनी त्यांच्या याचिकेतून केला आहे.
या प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. दिशाच्या शरीरावर जखमा झाल्या असून त्या अनैसर्गिक आहेत. पण तिच्यावर कोणताही बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाला नाही. त्यामुळे दिशाच्या वडिलांनी जो आरोप केला होता त्याचा पुरावा मात्र यातून समोर येत नाही. असं असलं तरी दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
दिशाचे पोस्टमॉर्टम हे पाच वर्षांपूर्वी करण्यात आलं असून ते राजकीय दबावातून करण्यात आल्याचा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे.
दिशा सालियन प्रकरणावरुन भाजपकडून राजकीय सूड उगवला जात आहे असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. दिशा सालियन यांच्या वडिलांचे समाधान होईपर्यंत लढावं, फक्त त्याच्या लढण्याचं राजकीय भांडवल होऊ देऊ नये असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला होता.