मराठी मोर्चाला परवानगी नाकारण्याच्या पार्श्वभूमीवर वादात सापडलेले मिरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गृह विभागाने आज त्यांना पदावरून हटवत त्यांची नियुक्ती अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) म्हणून केली आहे. त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक निकेत कौशिक यांची मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मिरा रोड येथे स्थानिक व्यापाऱ्यांनी हिंदी भाषिकांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. या मोर्चाला उत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल मंगळवारी मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, या मोर्चाला परवानगी नाकारल्याचा आरोप मनसेने केला होता. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर आज अचानक पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आल्याने, मराठी मोर्चा प्रकरण पोलीस आयुक्तांना चांगलंच भोवलं असल्याची चर्चा प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
नवीन आयुक्त कोण..?
नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले निकेत कौशिक हे अत्यंत शिस्तप्रिय आणि भ्रष्टाचारविरोधी कारवायांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले असून, प्रशासनातील कठोर निर्णयांसाठी त्यांची ओळख आहे.
राजकीय व सामाजिक वातावरण चिघळले असताना, नव्या आयुक्तांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
मोर्चाचं कारण काय होतं?
मिरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला वाद झाल्यानंतर मनसे विरुद्ध परप्रांतीय व्यापारी असा वाद निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढला होता. त्यानंतर मनसेनं मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली होती. मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर मोर्चात सहभागी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेण्यात येत होते. यावरुन मिरा भाईंदरमध्ये मोठा वादंग निर्माण झाला होता. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे देखील मोर्चात दाखल झाले होते. त्यांना मोर्चेकऱ्यांचा रोष पत्कारावा लागला. मात्र, त्यांनी देखील पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.