कर्नाटकमध्ये एकीकडे उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी ‘बंगळुरूमध्ये पाकिस्तान’ असल्याचं केलेलं विधान चर्चेत असताना दुसरीकडे भाजपाच्या एका आमदारानं कर्नाटक सरकारमधील काँग्रेसचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांच्याबाबत केलेलं विधान वादात सापडलं आहे. या विधानाचा वाद थेट कर्नाटक उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला असून न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांनी भाजपा आमदार बासनागौडा पाटील यतनाल यांना परखड शब्दांत खडसावलं आहे.
नेमकं घडलं काय?
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, दिनेश गुंडू राव यांच्या पत्नी तबू राव यांनी पोलिसांत यतनाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी यतनाल यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता. “बासनागौडा पाटील यतनाल यांनी दिनेश गुंडू राव यांचं घर म्हणजे अर्ध पाकिस्तान आहे असं विधान केलं होतं. भारतीय जनता पक्ष नेहमीच ‘भारत माता’ म्हणून उल्लेख करत असतो. पण ते महिलांचा सन्मान करू शकत नाहीत. जर ते दिनेशबद्दल बोलले तर मला त्यावर काहीही आक्षेप नाही. कारण ते राजकारणात आहेत. पण या सगळ्यामध्ये मला ओढलं जाणं मला आवडत नाही. माझ्या मुस्लीम पार्श्वभूमीसाठी मला लक्ष्य केलं जात असल्याचा आता मला वैताग आला आहे”, असं तबू राव यांनी म्हटलं होतं.
यतनाल यांनी या वर्षी एप्रिल महिन्यात गुंडू राव यंच्याबाबत केलेल्या विधानामुळे ते अडचणीत आले आहेत. गुंडू राव यांनी तेव्हा यतनाल यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना यतनाल यांनी गुंडू राव यांच्याबाबत विधान केलं होतं. “गुंडू राव यांचं घर म्हणजे अर्ध पाकिस्तान आहे. त्यामुळे देशविरोधी विधानं करणं ही त्यांची सवय आहे”, असं ते म्हणाले होते.
दरम्यान, त्यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण आता कर्नाटक उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आलं असून न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांच्या एकसदस्यी खंडपीठासमोर त्यावर सुनावणी चालू आहे. यतनाल यांनी आपल्याविरोधातील कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात केली आहे. या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्तींनी भाजपा आमदार बासनागौडा पाटील यतनाल यांना फैलावर घेतलं.
“तुम्ही अशा प्रकारे बोलू शकत नाही”
“अर्ध पाकिस्तान म्हणजे काय? तुम्हाला हे का म्हणायचं आहे? तुम्ही एखाद्या समाजाला अशा प्रकारे बोलू शकत नाही. ही पद्धत योग्य नाही. मी प्रत्येक प्रकरणाच्या सुनावणीवेळी हे सांगतोय. एकमेकांवर अशी चिखलफेक करण्यात काय अर्थ आहे. फक्त एखाद्याची पत्नी मुस्लीम आहे, याचा अर्थ तुम्ही त्यांना अर्ध-पाकिस्तानी म्हणाल?” असा सवाल न्यायमूर्तींनी यावेळी विचारला.