केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलं आहे. 15 एप्रिलपासून हा फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. या ओळखपत्राविषयीची सर्व माहिती एका क्लिकवर जाणून घ्या..
कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य सरकारने याबाबचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन आदेश शुक्रवारी 11 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना तातडीने संबंधि वेबसाइटवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, लवकरात लवकर ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने देता यावा, यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह 24 राज्यांमध्ये ‘ॲग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. परंतु अजूनही अनेक खेड्यापाड्यात या प्रकल्पाविषयीची माहिती व्यवस्थित पोहोचलेली नाही. …