प्रवासी पक्षांचे आगळेवेगळे खेळ.

Spread the love

“प्रवासी पक्षाचे गाणे” या माझ्या मागील ब्लॉगपोस्टमध्ये लांबवरच्या आमच्या प्रवासातली ख्यातनाम गायकांची सोबत आणि त्यामुळे न थकता करता येणारा लांबचा प्रवास याबद्दल मी सविस्तर लिहीले होतेच. पण ब्लॉगपोस्ट लिहील्यावर आठवले की त्यात काही काही गोष्टी लिहायच्या राहूनच गेल्या होत्या.

लांब प्रवासातल्या दुपारच्या वामकुक्षीनंतर जेव्हा आमचे कन्यारत्न जागे होई तेव्हा आम्ही पहाटेपासून जवळपास सहाशे – साडेसहाशे किलोमीटर प्रवास पार पाडलेला असे. ती तेव्हा पाचव्या – सहाव्या वर्गात असेल. साहजिकच ती थोडी कंटाळायची. आम्हा दोघांनाही तिचा कंटाळा जाणवला की आम्ही गाडीतल्या गाडीत एक नवीनच खेळ खेळायला सुरूवात करायचो.

समोरून येणा-या ट्रक्स मोजणे. नुसते मोजणे नाही तर त्यांचे वर्गीकरण टाटा, लेलॅण्ड आणि इतर सगळे यांच्यात करणे आणि आमच्यापैकी एकेकाने एकेका वर्गीकरणाची जबाबदारी स्वीकारणे. म्हणजे मी जर टाटा ट्रक्स घेतलेत तर कन्यारत्न लेलॅण्ड आणि आमच्या सौभाग्यवती आयशर व इतर सगळे या वर्गीकरणाची जबाबदारी घ्यायच्यात. मग त्यात नियम होते. फ़क्त पुढून विरूद्ध दिशेने आलेलाच ट्रक मोजायचा. आपल्याच दिशेने जाणारे, थांबलेले वगैरे ट्रक्स मोजायचे नाहीत. दोनशे ट्रक्स मोजेपर्यंत ज्याची संख्या जास्त होईल तो विजेता वगैरे. मग ड्रायव्हरसाहेबांसकट सगळ्यांच्या नजरा रस्त्यावर खिळून रहायच्यात. पुढून आलेला ट्रक आपला असेल तर सगळ्यांना कोण आनंद व्हायचा. मग त्यात भांडाभांडी, चिडवाचिडवीही व्हायची. हे भांडण मुख्य म्हणजे मी आणि आमचे कन्यारत्न यांच्यात व्हायचे. त्यात आमच्या सौभाग्यवती कायम रेफ़्रीची भूमिका घायच्यात.

म्हणजे आमचे कन्यारत्न हरायला लागले की “बाबा, तुला माहिती होतं की या भागात टाटाचे ट्रक्स जास्त चालतात म्हणून तू मुद्दामच स्वतः टाटा ट्रक्स घेतलेत आणि मला लेलॅण्ड दिलेत. मला निवडीचा चॉईस तू दिलाच नाहीस. आता पुढल्या खेपेला मी पहिल्यांदा निवडेन.” वगैरे भांडणं चालायचीत. बरं त्याच प्रवासात हे दोनशे पूर्ण झाले की आमचा नवा खेळ सुरू व्हायचा. त्यात आमचे कन्यारत्न हट्टाने टाटा घ्यायची आणि मी लेलॅण्ड. आमच्या घरातली सगळ्यात समजूतदार व्यक्ती म्हणजे माझी सुपत्नी आयशर व इतर हाच पर्याय निवडायची. मग त्यातही मी जिंकत आलोय हे पाहिल्यावर आमच्या कन्येची खूप चिड्चिड व्हायची आणि ती अशी चिडलेली पाहून आम्हा दोघांनाही खूप हसायला येत असे. आम्ही हसतोय हे पाहून तिची आणखी चिडचिड, रुसून बसणे वगैरे. गाडीत धमाल असायची. या सगळ्या खेळात शंभर दीडशे किलोमीटर प्रवास कसा व्हायचा हे कुणालाच कळत नसे. मजेमजेत, न कंटाळता प्रवास व्हायचा.

 

 

कधीकधी शहरी भागाजवळ असलोत की ट्रक्सऐवजी आम्ही कार्स मोजायला घायचोत. मी सुझुकीच्या, कन्या टाटाच्या तर तिची आई महिंद्रा आणि इतर सगळ्या कार्स अशी वाटणी व्हायची. यात कुणीही जिंकू शकेल अशी स्थिती असायची. कधी कधी दोनशे गाड्या मोजल्यानंतर 90 – 90 -20 अशी वाटणी व्हायची. मग आम्ही अगदी लोकसभेचे निकाल लागल्यासारखे आणि त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यासारखे एकमेकांशी वाटाघाती करीत असू. 20 जागा आलेला पक्ष ज्या 90 वाल्या पक्षाला पाठिंबा देईल त्याचेच सरकार बसेल असे असल्याने त्या 20 वाल्याच्या / वालीच्या मनधरण्या व्हायच्यात. खूप सगळी मंत्रीपदे किंवा कधीकधी पंतप्रधान पद देऊन त्याला / तिला मनवावे लागे आणि गाडीत सरकारची स्थापना होई.

त्यामुळे मधल्या एखाद्या भागात कधीकधी एखादा पक्ष 25 – 12 – 5 वगैरे संख्येने आघाडीवर असला तरी “अरे, आमच्या हक्काच्या मतदारांच्या भागातल्या पेट्या अजून यायच्या आहेत. मग बघा आम्ही कसे समोर जातोय ते. It is too early to predict and celebrate.” वगैरे शेरेबाजी सुरू व्हायची. अगदी मतमोजणीच्या दिवशी वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात जसा राजकीय नेत्यांचा माहोल असतो तसा माहोल कारमध्ये असायचा. त्यात कधीकधी एखादी टाटा ट्रक्सची रांग फ़ॅक्टरीतून कुठेतरी जायला निघालेली असायची आणि टाटा पक्षात एकदम मतसंख्या वाढायची. त्यावर अजून मजा. “बाबा, लेलॅण्डची फ़ॅक्टरी कुठे आहे रे ?” असा ज्ञान आणि रंजनाचा प्रश्न यायचा. चांगली चर्चा व्हायची. लेलॅण्डची फ़ॅक्टरी होसूर आणि चेन्नईजवळ आहे हे ऐकल्यानंतर आपल्या पुढल्या कर्नाटक आणि चेन्नई प्रवासात आपण लेलॅण्डच मागून घ्यायचं हा आमच्या कन्यारत्नाचा निर्धार पक्का व्हायचा.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *