करोडपती आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री,जाणून घ्या आतिशी मार्लेना यांच्याबद्दल

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

तब्बल 11 वर्षानंतर नवी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद महिलेकडे आले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद समर्थपणे सांभाळलं होतं. आता आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांच्याकडे हे पद आलं आहे. आतिशी या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत जवळच्या आहेत. विश्वासू सहकारी आहेत. शिवाय अत्यंत बुद्धीमान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. आतिशी या परदेशात शिकलेल्या आहेत. त्यांच्याकडे एक कोटीपेक्षा अधिक संपत्ती आहे.

आतिशी या आम आदमी पार्टीच्या आमदार आहेत. 8 जून 1981 रोजी दिल्लीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव तृप्ती वाही आणि वडिलांचं नाव विजय कुमार सिंग आहे. आतिशी यांचे वडील दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक होते. कार्ल मार्क्स आणि लेनिन यांच्या नावातून मार्लेना हा शब्द तयार करून आतिशी यांनी आपल्या नावामागे जोडला. त्यानंतर त्यांचं नाव आतिशी मार्लेना असं पडलं. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात. आतिशी यांचं शिक्षण दिल्लीच्या स्प्रिंगडेल शाळेतून झालं. त्यानंतर त्यांनी स्टिफेन्स कॉलेजातून पदवी घेतली. डीयूमधून शिक्षण घेतल्यावर त्यांनी रोड्स स्कॉलरशीप मिळवून लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून मास्टर्स केलं. आतिशी या मध्यप्रदेशातील एका छोट्या खेड्यात सात वर्ष राहिल्या होत्या. या ठिकाणी त्यांनी जैविक शेती आणि प्रगतीशील शिक्षण प्रणालीचा अभ्यास केला. अनेक एनजीओंसोबत त्यांनी काम केलं.

ना घर, ना जमीन
आतिशी यांनी 2012मध्ये राजकारणात पाऊल टाकलं. अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात त्या सामील झाल्या. त्या आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्या आहेत. 2019च्या निवडणुकीत दिल्ली पूर्वमधून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांनी त्यांना पराभूत केलं. त्यानंतरही पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. आतिशी यांना 2020मध्ये कालकाजी विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. या मतदारसंघातून त्या विजयी झाल्या. आतिशी मार्लेना यांच्याकडे 1 कोटीची संपत्ती असली तरी त्यांच्याकडे स्वत:चं घर नाही, जमीन नाही आणि कोणत्याही प्रकारची ज्वेलरी नाहीये.

फिक्स्ड डिपॉझिट आणि एफडीवर भर
आतिशी यांच्याकडे 1.41 कोटीची संपत्ती आहे. दिल्लीतील करोडपती मंत्री असूनही त्यांच्यावरच कोणतंही कर्ज नाही. 2020च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी दिल्लीच्या निवडणूक आयोगाकडे संपत्तीचं विवरण दिलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे 30 हजार रुपये असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर बँकेत डिपॉझिट आणि एफडी मिळून 1.22 कोटी रुपये असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

शेअरमध्ये गुंतवणूक नाही
आतिशी यांची बहुतेक संपत्ती ही बँक अकाऊंट आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहे. कोट्यधीश असूनही त्यांच्याकडे कोणताही शेअर बाँड नाही. कोणत्याही शेअरमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली नाहीये. त्यांनी एलआयसीचा एक प्लान घेतलेला आहे. त्यांच्या नावावर पाच लाखाचा एलआयसीचा आरोग्य विमा आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *