दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये एक्झिट पोलने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. जणू ही निवडणूक भाजपा एकहाती खेचून आणणार हे चित्र अगोदरच स्पष्ट झाले होते. मागील एक वर्षांपासून आपचे जे पानीपत झाले होते. ते सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’टी बार झाला. आपच्या ‘दारू’न पराभवाने 27 वर्षानंतर दिल्ली भाजपाच्या झोळीत अलगद येऊन पडली. या पराभवाचे विश्लेषण करताना संजय राऊत यांनी काँग्रेससह अण्णा हजारेंना चांगलाच चिमटा काढला.
आता लढायचा की एकत्र यायचा विचार व्हावा
महाराष्ट्रानंतर दिल्लीचे निकाल आले, त्यात आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता हे आकडे सांगत आहेत. आता लढायचा की एकत्र यायचा याचा विचार नेत्यांनी करायला हवा, याविषयीची भूमिका सगळ्यांनी घेणे आवश्यक आहे, असे राऊत म्हणाले. नाहीतर देशात आणि राज्या राज्यात जे काही चाललंय त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता द्यावी असा टोला त्यांनी इंडिया आघाडीला लगावला. जर असे असेल तर हा देश टिकेल का? लोकशाही टिकेल का? विरोधी पक्ष राहिल का? याचा विचार करावा लागेल, याची आठवण त्यांनी सहकारी पक्षांना करून दिली.
अण्णा हजारे यांच्या विधानाचा यावेळी राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. अण्णा काय म्हणतात याला आता काही विशेष अर्थ उरला नसल्याचे ते म्हणाले. मोदी काळात देशात, महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले, लोकशाहीवर हल्ले झाले, अत्याचार झाला. तेव्हा अण्णा हजारेंनी त्याविरोधात कधीच हालचाल केली नाही. साधा ब्र काढला नाही. पण केजरीवाल यांच्या दिल्लीतील पराभवाने त्यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काल पाहिला, त्यांना अत्यानंद झाला. हा आनंद लोकशाहीला मारक आहे, असा हल्लाबोल त्यांनी अण्णांवर केला.
अण्णा हजारेंना खोचक सवाल
केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठे आंदोलन उभं केले होते. या आंदोलनामुळेच अण्णा देशाला माहिती झाले. पण गेल्या 12 वर्षात या देशावर अशी अनेक संकटं आलीत. देश लुटला जात आहे. विकल्या जात आहे. एकाच उद्योगपतीच्या घशात देशाची सार्वजनिक संपत्ती घातल्या जात आहे. भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये पवित्र करून घेण्यात येत आहे. पण अण्णांना त्यावर आपले मत व्यक्त करावं असं वाटत नाही, यामागचं रहस्य काय असा खोचक सवाल त्यांनी केला.
दिल्लीत जो पराभव झाला आहे तो केजरीवाल यांनी पण स्वीकारलेला आहे. केजरीवाल हरल्याचा आनंद अण्णा हजारे यांच्या सारख्या लोकांना आणि आपच्या परभवाचा आनंद काँग्रेसला झाला असेल तर ते दुखद आहे, असा आसूड त्यांनी ओढला. कारण भाजपा सत्तेत आली आहे, हे त्यांनी विसरू नये, याची आठवण राऊतांनी करून दिली.