दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. सहा महिने तुरुंगात काढल्यानंतर जामीनावर बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी आपल्या आम आदमी पक्ष कार्यालयास प्रथमच आज (15 सप्टेंबर) भेट दिली. या वेळी पक्ष कार्यकर्ते आणि उपस्थितांसह दिल्लीच्या जनतेला उद्देशून संबोधताना ते बोलत होते. केजरीवल यांनी म्हटले की, येत्या दोन दिवसात पक्षाच्या कार्यकारिणीची एक बैक आयोजित केली जाईल. या बैठकीत माझ्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल आणि जर दिल्लीच्या जनतेला वाटले की, केजरीवाल आणि सिसोदिया प्रामाणि आहेत, तरच आम्ही परत पदावर स्थानपन्न होऊ.
दोन दिवसांमध्येच राजीनामा
अरविंद केजरीवाल यांनी ठासून सांगितले की, दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. जोपर्यंत जनता निकाल जाहीर करत नाही तोपर्यंत मी त्या खुर्चीवर बसणार नाही. दिल्लीत निवडणुकीला काही महिने बाकी आहेत. मला कोर्टातून कायदेशीर न्याय मिळाला, आता जनतेच्या कोर्टातून न्याय मिळेल याची खाही आहे. जनतेच्या आदेशानंतरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन, असे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीच्या निवडणुका महाराष्ट्रासोबतच घ्या
आम आदमी पक्ष संयोजक असलेल्या केजरीवाल यांनी म्हटले की, आपण राजीनामा दिल्यानंतर थेट जनतेत जाणार आहोत. जनतेमध्ये जाऊन आपण त्यांचा पाठिंबा मागू. त्यानंतरच जनतेने न्याय आणि आदेश दिला तरच आपण पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू. दरम्यान, आपण निवडणुकांनासामोरे जाण्यास तयार आहोत. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुका महाराष्ट्रातील निवडणुकांसोबत नोव्हेंबरमध्ये घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली.
नवा चेहरा की, राष्ट्रपती राजवट?
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या चेहऱ्याला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे. शिवाय, राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्ष नवा चेहरा समोर करतो की, दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागते? याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. त्यांनी असेही स्पष्ट केले की, मी आणि मनिष सिसोदीया आमच्या दोघांच्याही मनामध्ये एकच विचार आहे. तो म्हणजे जोपर्यंत दिल्लीची जनता सांगत नाही की, तुम्ही प्रामाणिक आहात तोवर आम्ही दोघेही आपापल्या विद्यमान पदावर बसणार नाही.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. याशिवाय भाजपच्या नेतृत्वाखाली काम करणारी दिल्लीती स्थानिक स्वराज्य संस्था हा देखील आम आदमी पक्षासाठी नेहमीच डोकेदुकीचा विषय असतो. असे असताना केंद्र सरकारच्या अधिपथ्याखाली येणाऱ्या सर्वच तपास यंत्रणा भाजप विरोधकांवर जोरदार कारवाई करताना दिसतात. ज्यामध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वास संजय राऊत आणि तत्कालीन महाविकासआघाडीत मंत्री असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. झारखंडमध्येही हेमंत सोरेन यांना अटक करुन तुरुंगात टाकण्यात आले. अशा प्रकारच्या कारवाया देशभरात पाहायला मिळाल्या. त्यामुळे केजरीवल यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे.