स्पेनमध्ये आलेल्या शतकातील महाभीषण पुरामधील बळींची संख्या शुक्रवारी २०५ वर पोहोचली. अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. या आपत्तीमुळे स्पॅनिश नागरिकांत एकीकडे संताप आणि वैफल्याची भावना दाटली आहे; परंतु त्याच वेळी देशवासीयांबाबत एकोप्याचीही भावना दिसत आहे. मंगळवार आणि बुधवारी आलेल्या वादळ आणि पुरामुळे त्सुनामीच्या आठवणी जाग्या झाल्याची भावना नागरिकांत आहे.
घरे, मोटारी वाहून गेल्या आहेत. आपल्या प्रियजनांच्या आठवणी लोक गोळा करीत आहेत. या पुरामुळे सर्वाधिक हानी व्हॅलेन्सिया शहरात झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ‘परिस्थिती अविश्सवनीय झाली आहे. या आपत्तीमध्ये मिळत असलेली मदत अत्यंत तोकडी आहे,’ अशी माहिती मसानसा या उपनगरातील रहिवासी एमिलिओ कुआर्तेरो यांनी दिली. चिबा शहरात शुक्रवारी सकाळी रस्त्यांवर साचलेला चिखल हटविण्याचे काम सुरू होते. व्हॅलेन्सियामध्ये मंगळवारी आठ तासांत वीस महिन्यांच्या सरासरीइतका पाऊस पडला होता. पिण्याचे पाणी संपल्यामुळे इतर ठिकाणांहून ते आणावे लागत आहे.
पैपोर्ता भागात ६२ जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. तेथील रहिवाशांना पाणी किंवा जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठी कित्येक किलोमीटर दूर व्हॅलेन्सियापर्यंत जावे लागत आहे. मदतीसाठी येणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. मात्र, या भागात चिखलामुळे कोंडी होण्याची शक्यता असल्याने कोणीही वाहने आणू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.