कॉमेडियन कपिल शर्मा, कोरिओग्राफर रेमो डिसूझासह अनेक सेलिब्रिटींना जीवे मारण्याच्या धमक्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पाकिस्तानमधून ई-मेलद्वारे ही धमकी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कपिलच्या आधी अभिनेता राजपाल यादव, कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांनासुद्धा ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात BNS च्या कलम 351 (3) अंतर्गत अंबोली पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून हे धमकीचे ई-मेल आले आहेत.

या ई-मेलमध्ये लिहिलंय, ‘आम्ही तुमच्या अलीकडील हालचालींवर लक्ष ठेवून आहोत आणि आम्हाला वाटतंय की एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणं महत्त्वाचं आहे. हा कोणताही पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही तुम्हाला हा संदेश अत्यंत गांभीर्याने आणि गोपनीयतेने हाताळण्याची विनंती करतो.’ या ई-मेलच्या अखेरीस ‘बिष्णू’ असं नाव लिहिण्यात आलं आहे. पुढील 8 तासांत उत्तर द्या अन्यथा तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी धमकी या मेलद्वारे देण्यात आली आहे.

कपिल शर्मा आणि राजपाल यादव यांच्या तक्रारींवरून मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तर सुगंधा मिश्राच्या तक्रारीनुसार अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेमो डिसूझानेही त्याला मिळालेल्या धमकीच्या ई-मेलबद्दल अधिकाऱ्यांना सूचित केलं आहे. यांना एकाच वेळी नव्हे तर वेगवेगळ्या वेळी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं कळतंय.

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार, अभिनेता सलमान खानला आलेल्या धमक्या आणि अलीकडेच अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्यानंतर शहरातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईतील वांद्रे परिसरात बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी तुरुंगात कैद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने स्वीकारली होती. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. सलमानने त्याच्या बाल्कनीत बुलेटप्रूफ खिडक्याही बसवल्या आहेत. याशिवाय 16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोराने सैफवर सहा वार केले. पाच दिवसांच्या उपचारानंतर अखेर मंगळवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *