शेतकरी-ओबीसीविरोधी!
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कुंपनानेच शेत खावे !
असा किस्सा. गोशाळा म्हणजे गोवंश संवर्धन करणारी तथाकथित संस्था. अशा गोशाळेतून गायी चक्क कसायला विकण्याचे काम चालते.असे खळबळजनक विधान नुकतेच मेनका गांधी यांनी केले. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघावर (इस्कॉन) कठोर शब्दांत टीका करताना या संघटनेवर फसवणुकीचा आरोप त्यांनी केला.(दै.सकाळ, नागपूर दि.२८.०९.२०२३). ही संस्था जगभरात बैल आणि गायींचे संरक्षण करण्याचे काम करत असल्याचे सांगितले जाते. असे असताना मेनका गांधी यांनी साधलेला निशाणा फार गंभीर ठरतो. गायीचे राजकारण आणि अर्थकारण दोन्ही ब्राम्हणेतर हिंदूंच्या विरोधात जाते. मुस्लिम गायींची कत्तल करून गोमांस विक्री करतात गोमांस खातात. गोधनाचा व्यापार करतात म्हणून टोकाचा धर्मद्वेष पसरवता येतो. वास्तविक पाहता गोमांस खरेदी विक्रीचा मोठा व्यापार जागतिक स्तरावर चालतो त्या व्यसायात कोण आहेत?
भारतातून जगभरात बीफ निर्यात करणाऱ्या लहानमोठ्या जवळपास ७० ते ७५ मान्यताप्राप्त कंपन्या आहेत.त्यापैकी प्रमुख १० कंपन्या आणि त्यांच्या मालकांची नावे खालीलप्रमाणे :
१) अल कबीर एक्स्पोर्ट्स प्राइवेट लिमिटेड,तेलंगणा मालक – सुरेश सब्बरवाल
२) अरेबियन एक्सपोर्ट्स, मुख्यालय-मुंबई
मालक सुनील कपूर
३) एमकेआर एक्सपोर्ट्स, मोहाली-पंजाब
मालक सनी एबट
४) अल नूर एक्सपोर्ट्स, मुजफ्फरनगर
मालक सुनील सूद
५) एओवी एक्सपोर्ट्स,उन्नाव
मालक ओ.पी.अरोरा
६) स्टैंडर्ड फ्रोजन फूड्स एक्सपोर्ट्स प्राइवेट लिमिटेड,हापूड-शिवपुरी मालक कमल वर्मा
७) पोन्ने प्रोडक्ट्स एक्सपोर्ट्स,तामिळनाडू
मालक एम शास्ती कुमार
८) अश्विनी एग्रो एक्सपोर्ट्स,गांधीनगर
मालक के.राजेंद्रन
९) महाराष्ट्र फूड्स प्रोसेसिंग,सातारा -महाराष्ट्र मालक सन्नी खट्टर
१०) कनक ट्रेडर्स,दिल्ली
मालक राजेश स्वामी
सध्या वर्षाला तब्बल २० लाख टन बीफ भारत निर्यात करतोय आणि या व्यापाराची उलाढाल ५० हजार कोटींच्या वर आहे..!
यातील काही कंपन्यांची नावं मुस्लिम धाटणीची आहेत परंतु त्यांचे मालक ब्राम्हण असल्याचं लक्षात येईल.
तथापि,मुस्लिमविरोधी धार्मिक ध्रुवीकरणासाठी गायीचा कौशल्याने वापर करुन मुस्लीमविरोधी वातावरण तयार करुन आणि त्याचा राजकीय फायदा उत्तरप्रदेश सारख्या राज्यात धर्मांध सत्ता प्रबळ होण्यासाठी केला गेला. या संदर्भात समाजमाध्यमावरील एक पोस्ट अस्वस्थ करणारी आहे.
“गाय मारणा-याला ठार करणेच योग्य” अशा आशयाचा लेख वेदांचा हवाला देवून तुफैल चतुर्वेदी यांनी पांचजन्यमध्ये लिहिला असून तसे वेदांत आदेशच आहेत असेही प्रतिपादन केले आहे.
वैदिक धर्मांधांनी किती अधम पातळी गाठली याचे हे एक शर्मनाक उदाहरण आहे. मुळात वेदात असली कसलीही धर्माज्ञा नाही. दुसरी बाब म्हणजे वेद हे हिंदुंचे धर्मग्रंथ नाहीत. त्यामुळे वेदात काय सांगितले ते हिंदुंना कधीच लागु नव्हते व नाही. मुस्लिमद्वेषाच्या नावाखाली हिंदुंवर वैदिकता थोपण्याचे आणि भारतीय मुस्लिमांना भयभीत करण्याचे हे कारस्थान आहे.
गाय, बैल व इतर (पाच नखे असलेले अभक्ष प्राणी वगळता) अन्य खाद्य प्राणी वैदिक खात असत व यज्ञांतही बळी देत असत. गोवधासाठी गोमेध यज्ञ तर अश्वासाठी अश्वमेध यज्ञ केला जात असे. (संदर्भ-The Indian Encyclopaedia, Volume 1, edited by Subodh Kapoor. आणि पहा ऋग्वेद १.१६२.२, ६.१७.१, १०.८५.१३, कृष्ण यजुर्वेद- ८.२१, १.६२.२, शुक्ल यजुर्वेद अध्याय २४…) असे खूप संदर्भ वेदात व वैदिक साहित्यात येतात. तरीही वैदिकांची लबाडी अशी कि आताही कोणाला वेदच माहित नाहीत असे समजून कोलांटउड्या मारतात. लांड्यालबाड्या करून लोकांना फसवायचा आणि भडकवायचा काळ गेला आहे हे यांनी लक्षात ठेवावे.
हिंदुंनी वैदिकांपासून आता तर जास्तच सावध असले पाहिजे. वेदवर्चस्वता लादण्याची आणि मुस्लिम द्वेषाला हिंसेची धार देण्याची रणनिती अंमलात आणण्याची ही तयारी दिसते आहे!
माणसांच्या हत्येचे लंगडे समर्थन करणा-या प्रवृत्तीचा निषेध!
या देशात हजारो गोशाळा आहेत. त्यावर आधारित अर्थकारण लक्षात घेता गोशाळेतून होणारे प्राणिज उत्पादन त्याचे लाभार्थी भाकड जनावरांची सोय,आणि मनेका गांधींची गोशाळेच्या बाबतीत केलेले आरोप ध्यानात घ्यावे लागतात.
व्हॅलेन्टाईन डेला गायीला हग करायला सांगून ब्राम्हणेतरओबीसीहिंदुंना उचकवतात ते बिळात दडून बसून करतात. त्यांनी तर आपल्या खऱ्या चारित्र्याचा परिचय अनेकदा करुन दिला. धार्मिक भावनांचा वापर करण्यात ज्यांचा हातखंडा आहे, असे हे बहुरूपी, खरा रंग ओळखायला हवा त्यांचा.त्यांना गायीबद्दल कधीच प्रेम नव्हते आणि नाही. “यज्ञांसाठी व आतिथ्यासाठी अगदी गाईंचीही हत्या केली जात होती, हे एक ऐतिहासिक सत्य आहे. उदा.ऐतरेय ब्राम्हणात म्हटले आहे, ‘राजा वा दुसरा कोणी आदरणीय मनुष्य आला असता, ज्याप्रमाणे बैल वा गाय मारतात…’महर्षी वसिष्ठ हे वाल्मीकींच्या आश्रमात आल्याबरोबर त्यांच्या स्वागतासाठी गरीब बिचारी कालवड मारली, असे भवभूतीच्या उत्तररामचरितातील सौधातकी म्हणतो.यज्ञात गाई मारल्यामुळे निर्माण झालेली रन्तिदेव राजाची कीर्ती चर्मण्वती नदीच्या रुपाने परिणत झाली, असे कालिदासाने मेघदूतात म्हटले आहे. यज्ञात मारलेल्या गाईच्या चर्माचे (कातड्यांचे)ढीग पडल्यामुळे सध्याच्या चंबळ नदीला पूर्वी ‘चर्मण्वती’ असे नाव मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते.”(पृ.९६,आस्तिकशिरोमणी चार्वाक ले.डॉ. आ.ह.साळुंखे) चार्वाकांनी यज्ञातील हिंसेमुळेही यज्ञविरोधी भूमिका घेतली.
यज्ञ संस्कृतीचा ढिंढोरा पिटणाऱ्यांनी यज्ञात किती गोवंशाची आहुती दिली. तेव्हा गोवंश वाचवण्यासाठी यज्ञाला विरोध कुणी केला. शेती करण्यासाठी बैल अत्यंत उपयुक्त त्या बैलाची माता गाय. गाय वाचली तर गोधन वाढेल शेतीकरिता बैल मिळतील. म्हणून यज्ञात होणाऱ्या गोमेध यज्ञाला विरोध होत असे. या देशातील कृषीसंस्कृतीच्या रक्षकांनी गोवंश वाढवला. आणि व्हलेंटाईन डे ला गायीला हग करा असे सांगतात त्यांच्या खुंटीला गाय कधी दिसली ? आमचे शेतकरी गायी पाळतात गायीचे शेण काढतात गोठा स्वच्छ करतात चारापाणी करतात.पोटच्या लेकरांसारखी गोवंशाची हिफाजत करतात, कुटुंबातील सदस्यांसारखे संगोपन करतात. या कामात घरची आबालवृद्ध खपतात. गोपालनापोटी कित्येक शेतकऱ्यांच्या पुत्रांची शाळा बुडाली.पण कुटुंबातील सदस्यांसारखे वत्सलतेने गोपालन केले जाते.शालेय पाठ्यपुस्तकात रंगराव पाटलांनी ‘पाखऱ्या’ या पाठातून शेतकरी कुटुंबातील सर्व लोकांची भूतदया जिवंतपणे साकारलेली अजूनही आठवते. प्रत्यक्षात गाय आणि शेतकरी ओबीसी असे उत्कट जिव्हाळ्याचे अनुबंध बघायला मिळतात.
आर्यपूर्व सिंधुसंस्कृतीतून आलेली ही आमची कृषिसंस्कृतीची मूल्ये आजही आमचे कष्टकरी समाजातील बायाबापुडे उराशी बाळगून आहेत. असे असताना या देशात ‘गायी’ वरुन राजकारण करुन धार्मिक ध्रुविकरणाचे रंग उधळले जातात. मुस्लिम ख्रिश्चन आदी परधर्मी गायीची कत्तल करतात म्हणून धर्मद्वेष पेरला जातो.अशा कपटकारस्थानी कारवायांपासून शेतकरी ओबीसीनी सावध राहिले पाहिजे. गायींवरून मुस्लिमांचा द्वेष समाजात पसरवत असताना ओबीसी शेतकरी यांची माथी भडकवून त्यांचा केवळ मतासाठी दंगलीसाठी वापर करून घेणे असा सनातन्यांचा छुपा अजेंडा ध्यानात घेतला पाहिजे. गायीबद्दल बेगडी प्रेम असणाऱ्यांच्या गोरखधंद्यावर मनेका गांधींनी केलेले आरोप गांभीर्याने समजून घेतले पाहिजे.
■ लेखक : अनुज हुलके