तुमच्या हिताचा निवडून द्या पण शक्यतो पाडापाडी कराच, मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना सल्ला

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेण्याची घोषणा केली होती. फक्त एका जातीच्या बळावर निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे आता मराठा समाजाने आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत पाडावे, असा आदेश जरांगे पाटील यांनी दिला होता. यानंतर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बुधवारपासून बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केलीय. गेवराई तालुक्यातील त्वरिता देवीचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांच्या दौऱ्याला सुरुवात झाली.

विधानसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही त्यांना खडे बोल सुनावत त्यांनीच पचका करून ठेवला असल्याचं पाटील यांनी म्हटले. मी ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितले होते. अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका. त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे ते पडणार नाहीत. समाजाला सांगितले आहे. माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही.

मला समाजाचे भविष्य बघायचं आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. दीडशे जणांना उभे केले असते. मात्र, त्यांच्यासाठी सहा कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मी मूर्खासारखे चाळे नाही करू शकत, मागे सरकलो म्हणून काय वाईट झाले. मी मराठा समाजाचे काम करतो दीडशे जणांचे काम करत नाही. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांना अडचणीत आणणार नाही. ते जर पडले असते तर समाजाला हिणवले गेले असते, टोमणे मिळाले असते, त्यामुळे माझी समाजाची मान खाली जाईल म्हणून मी माघार घेतली. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून मी ही भूमिका घेतल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मी आंबेडकर यांना माघारी बोललेलो नाही. मी चाटळपणा करत नाही. मी एखाद्याला मानतो म्हटलं की मानतोच. माझ्यासोबत ते असले की, चांगलं म्हणायचं आणि नसले की वाईट तसं नाही. ते काही म्हटले तरी मी उत्तर देणार नाही. आजपासून पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. आम्हाला कुणाच्याही प्रचाराला जायची गरज नाही. आता पुन्हा लढा उभा करायचा आणि आरक्षण मिळवायचं. राजकारणासाठी असतो तर उमेदवार उभे केले असते माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. या समाजाला मी मायबाप मानले आहे. समाज अडचणीत येऊ नये म्हणून मी योग्य पाऊल उचलत आहे. कुणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका, माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल तिकडेच मतदान करायचे, पण शक्यतो पाडापाडी कराच, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *