सिंधुदुर्गात प्रवेश करताना पुन्हा गाडी अडवली; उद्धव ठाकरे संतापले

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बॅग तपासणीचा मुद्दा गाजत आहे. निवडणूक काळात निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्यात येतात. सोमवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी औसामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावरुन तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी झापलं. उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला.

आज बुधवारी उद्धव ठाकरे गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना महाराष्ट्र-गोवा सीमेवर इन्सुली चेक पोस्टवर पुन्हा असाच प्रकार घडला. गोव्यात विमानतळावर उतरुन गाडीने सिंधुदुर्गात प्रवेश करताना इन्सुली चेक पोस्टवर त्यांची गाडी अडवण्यात आली. ज्या अधिकाऱ्याने गाडी अडवली, तो क्षणात तिथून गायब झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी गाडीची काच खाली केली. ते संतापलेले दिसत होते. त्यांच्यासोबत यावेळी गाडीमध्ये शेजारी पुत्र तेजस ठाकरे बसले होते. सिंधुदुर्गात आज उद्धव ठाकरे यांच्या तीन प्रचार सभा आहेत.

‘त्यांच्या नियुक्ती पत्राची मागणी केली’

सोमवारी वणीमध्ये त्यानंतर मंगळवारी औसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांनी देखील अधिकाऱ्यांची उलट तपासणी केली. उद्धव ठाकरे हेलीपॅडवर उतरले असता अधिकाऱ्यांनी त्यांना बॅगेची तपासणी करायची आहे असं सांगितलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्या अधिकाऱ्यांना त्यांचं आयकार्ड दाखवायला सांगितलं. आयकार्ड पाहिल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडे त्यांच्या नियुक्ती पत्राची मागणी केली. तुम्ही कोणत्या विभागाचे आहात याची देखील चौकशी केली. त्यानंतर तुम्ही तुमचं पाकीट देखील दाखवा त्यात किती पैसे आहेत असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधाला. त्यांच्या बॅगेची तपासणी का होत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी केला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *