लेखणी बुलंद टीम:
नागपूर दंगलीचा कथित मास्टर माईंड फईम खान यांच्या घरावर मनपाकडून आज बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. फहीम खान याच्या नागपूरच्या (Nagpur Violence) टेकानाका परिसरातील घर बांधतांना काही भागात अतिक्रमण केलंय. नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला या संदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूर महानगर पालिकेचे पथक फहीम खानच्या घरी पोहचले असून तोडकाम करण्याच्या कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. दरम्यान या आधीच फहीम खानच्या परिवाराने रात्री घर रिकामे केलं असल्याचे दिसून आले आहे. तर हे घर फहिम खानच्या आईच्या नावाने असल्याची माहिती पुढे आली आहे. EWS अंतर्गत NITने 30 वर्षाच्या लीजवर खानच्या परिवाराला जागा दिल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. मनपाच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर यशोधरा नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता या प्रकरणी फहीम खानच्या अडचणी आणखी वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सरकारने दंगेखोरांना मेसेज दिला, दोन दुकानेही सील
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 20 मार्च रोजी या घराची पाहणी करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे उल्लंघन केल्याचे नमूद केले होते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या घराचा कोणताही बिल्डिंग प्लॅन मंजूर झालेला नाही, त्यामुळे ते बेकायदा बांधकामाच्या श्रेणीत येते. शनिवारी नागपूर पोलिसांनी फहीम खानच्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शी संबंधित हिंसाचाराच्या आरोपींनी वापरलेली दोन दुकानेही सील केली होती. अशातच दोन जेसीबीच्या मदतीने नागपूरमध्ये फहीम खानच घर तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.