पुणे जिल्ह्यात लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. रक्षाबंधनाला (raksha bandhan 2025) भाऊ रिकाम्या हाताने आला तर जीवे मारुन टाकू, अशी धमकी नवऱ्याने विवाहितेला दिली होती. यानंतर या विवाहित महिलेने गळफास (Suicide News) घेऊन आत्महत्या केली. स्नेहा विशाल झेंडगे (वय 27) असे या महिलेचे नाव आहे. ती पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहत होती. स्नेहाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी स्नेहा झेंडगे हिचा नवरा विशाल, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे आणि दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील हुंडाबळींची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी स्नेहा हिने आत्महत्या (Pune Crime News) केली. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. याबाबत माहिती देताना स्नेहाचे वडील कैलास सावंत म्हणाले की, आम्ही झेंडगे कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर काही महिने झेंडगे कुटुंबीय मोहोळला राहत होते, नंतर ते पुण्यात राहायला आले. आम्ही स्नेहाचा नवरा विशाल याच्या मागणीप्रमाणे शेतजमीन घेण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये दिले. झेंडगे कुटुंबीय पुण्यात कुठे राहायला आले आहेत, हे त्यांनी आम्हाला सांगितले नव्हते. झेंडगे यांची वेळू येथे कंपनी आहे. स्नेहाचे भाऊ कंपनीत गेले होते, त्यावेळी त्यांना हाकलून देण्यात आले, असे स्नेहाच्या वडिलांनी सांगितले.
Pune Suicide News: लग्न झाल्यावर स्वयंपाक येत नसल्यावरुन जाच नंतर हुंड्यासाठी धमकी
स्नेहा झेंडगे आणि विशाल झेंडगे यांचे गेल्यावर्षी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस स्नेहाचे आयुष्य सुरळीत चालले, मात्र लवकरच सासरकडून त्रास सुरू झाला. सुरुवातीला स्नेहाला स्वयंपाक नीट येत नाही, असे सांगून त्रास दिला जायचा. नंतर पती व कुटुंबीयांनी कंपनी सुरू करण्यासाठी तब्बल 20 लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम आणून द्यावी म्हणून स्नेहावर वेळोवेळी दबाव आणला जाऊ लागला. पैसे मिळवण्यासाठी केवळ मानसिक छळच नव्हे तर मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारची वागणूक दिली जात होती. या सगळ्याला कंटाळून स्नेहाने यापूर्वी पोलिसांत एक गुन्हा दाखल केला होता. मात्र, सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन तो गुन्हा मागे घेण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे स्नेहाचे मानसिक तणाव अधिकच वाढले. सातत्याने होणारा छळ, आर्थिक मागणी आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे ती पूर्णपणे खचली. अखेर 9 ऑगस्ट 2025 रोजी घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले.