लाडकी बहीण योजना म्हणजे राज्यभरात चर्चेचा विषय. योजना पुढे कार्यन्वित राहणार की नाही इथपासून ते आता सरकार निकषांची वार्ता करत आहे. त्यामुळे निकषात (Ladki Bahin Yojana Eligibility) नेमके बसणार तरी कोण? असा सवाल उपस्थित केला जात असतानाच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केल्या विधानामुळे नवाच मुद्दा समोर आला आहे. अगदी अलिकडेच म्हणजेच काही दिवसांपासूनच राज्यातील महिलांना केवळ लाडकी बहीण योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान योजना यांपैकी कोणत्याही एकाची निवड करावी लागणार, अशी चर्चा सुरु होती. त्यातच कृषीमंत्र्यांनी “लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) लाभ घ्यायचा? हे महिलांनी ठरवावं”, असं थेट विधान केले आहे. ज्यामुळे या दोन्हीपैकी केवळ एकाच योजनेचा लाभ महिलांना मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
निकषात बसेल तरच बहीण लाडकी
विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर महायुती सरकार सत्तेत आलं. सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर डिसेंबर महिन्यातील हप्ता जमाही करण्यात आला. मात्र, असे असले तरी या आधी या योजनेचा लाभ घेतलेल्या काही महिलांना डिसेंबर महिन्यातील लाभाचा हप्ता मिळाला नसल्याचा आरोप केला जात आहे. सांगितले जात आहे की, या योजनेचा लाभा देण्यापूर्वी निकषांचा विचार केला जात आहे. ज्या महिला निकषात बसतील त्यांच्याच खात्यावर हा हप्ता पाठवला जाणार असल्याचे वृत्त आहे.
निकष डावलणाऱ्यांवर कारवाई
दरम्यान, या योजनेचा लाभ घेताना ज्या महिलांनी निकष डावलले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. ज्यामध्ये अशा कारवाईचे पहिले उदाहरण धुळे जिल्ह्यात घडले आहे. येथील एका महिलेस या योजनेंतर्गत देण्यात आलेले साडेसात हजार रुपये कारवाई करत पुन्हा एकदा सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षीततेची भावना आहे. त्यातच काल (शनिवार, 4 जानेवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी थेट “लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा? हे महिलांनी ठरवावं”, असे म्हटले आहे. त्यामुळे या दोनपैकी कोणत्याही एका योजनेचाच लाभ लाभार्थ्याला घ्यावा लागणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे.
‘महिलांनो दोन्हीपैकी एकच निवडा’
आपला मुद्दा अधिक विस्ताराने मांडताना माणिकराव कोकाटे म्हणाले, लाडकी बहीण योजना असो की, नमो शेतकरी महासन्मान योजना. कोणत्याही लाभार्थ्याने दोनपैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा असा नियमआहे. त्यामुळे आता स्वत: महिलांनीच हा निर्णय घ्यायचा आहे की, आपण नेमका कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा.
जर एखाद्या महिलेने दोन्ही योजनांचा लाभ घेतला असेल तर त्यापैकी एका योजनेच्या लाभाला कात्री लागणार का? असे विचारले असता कृषीमंत्र्यांनी अद्याप असा निर्णय झालेला नाही. मात्र, स्वत: महिलांनीच कोणत्याही एकाच योजनेत सहभाही व्हावे अशी अपेक्षा आहे. जसे की, एकाच व्यक्तीच्या नावावर दोन योजनांचा फायदा घेता येत नाही. एका जामीनावर दोन ठिकाणी कर्ज घेता येत नाही त्याच पद्धतीने सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. पण तसे घडले तर, दोन योजनांचा लाभ महिला घेऊ शकतील असा जीआर सरकारला काढावा लागेल, असेही ते म्हणाले.