भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला आहे. विनोद तावडे (Vinod Tawde) हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या (BVA) कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्य राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विनोद तावडे गेल्या अडीच तासांपासून हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. बविआच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी ठिय्या देत तावडेंची वाट रोखून धरली आहे. या घटनेनंतर पोलीस आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बविआच्या आरोपानुसार, विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु होती.
याबाबत बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी ‘एबीपी’शी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या. विनोद तावडे सांगतात की, तिकडे बैठक सुरु होती. पण मतदानापूर्वी 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का, एवढी अक्कल तावडेंना नाही का? विनोद तावडे यांनी याठिकाणी वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते. आता पोलीस याप्रकरणात काय करणार, हे बघायचं आहे. सरकार त्यांचंच आहे, त्यामुळे पुढे काही होणार नाही, असेही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले.
विनोद तावडेंनी माफी मागण्यासाठी मला फोन केला: हितेंद्र ठाकूर
या घटनेनंतर विनोद तावडे यांनी मला 25 वेळा फोन करुन माफी मागितली, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. प्रकरण जास्त ताणू नका, असे तावडेंनी सांगितल्याचे ठाकूर यांनी म्हटले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
विवांता हॉटेलमधील बैठकीला भाजपचे उमेदवार राजन नाईकही उपस्थित होते. हॉटेलमध्ये जी पैशांची बंडलं सापडली त्याचा भाजपशी कोणताही संबंध नाही. तुम्ही हॉटेलचे गेट बंद करुन आमच्या कार्यकर्त्यांची तपासणी करा, असे राजन नाईक यांनी म्हटले. विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात काय संवाद झाला, मला माहिती नाही. मी बाजूला होतो, असे राजन नाईक यांनी स्पष्ट केले.
अतुल भातखळकर काय म्हणाले?
पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधक असे आरोप करत आहेत, असं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सांगितले. तुम्ही रडीचा डाव खेळू नका, लोकशाही आहे, सामोरे जावा, असं अतुल भातखळकर हितेंद्र ठाकूर यांना म्हणाले.
ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची टीका
या घटनेनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विनोद तावडे आणि भाजपवर प्रचंड आगपाखड केली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेलिकॉप्टर्समधील बॅगा तपासल्या. मग विनोद तावडे यांची बॅग तपासण्यात आली नव्हती का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी विनोद तावडे यांचा बचाव केला. विनोद तावडे त्याठिकाणी पैसे वाटण्यासाठी गेले नव्हते. विरोधक निवडणूक हारणार असल्यामुळे असले आरोप करत आहेत. पोलिसांना याप्रकरणाची चौकशी करु द्या. त्यानंतर तथ्य बाहेर येईल, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.