शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांवर उद्या 921 कोटी जमा होणार आहेत. पंतप्रधान पीकविमा योजनेतील मागील वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई उद्या म्हणजेच सोमवारी (ता -11) शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. यामध्ये खरिपातील नुकसान भरपाई ही 809 कोटी आहे तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
याआधी पीकविम्याची नुकसानभरपाई कंपन्यांकडून त्या-त्या वेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती; मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर उद्या म्हणजेच सोमवारी (ता -11) पहिल्यांदाच नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यांमध्ये ‘डीबीटी’द्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल.
शेतकऱ्यांना चांगल्या भरपाईची आशा….
नुकसान भरपाईचे निकषही कठोर केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली. या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचीही नुकसानभरपाई प्रलंबित होती. राज्य सरकारने 1 हजार 28 कोटी रुपयांचा हा हप्ता 13 जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला.
त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या हंगामात 95 लाख 65 हजार अर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना 4 हजार 397 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार होती. त्यापैकी 80 लाख 40 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 588 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते. तर 15 लाख 25 हजार शेतकऱ्यांना 809 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते.
नुकसानभरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनूत होणार
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आता ही 921 कोटी रुपयांची नुकसानभरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘डीबीटी’ने जमा केली जाणार आहे. नुकसानभरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे पार पडणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.