राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांची आता काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर तब्बल 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.काही दिवसांपूर्वी सरकारने ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे की नाही, हे तपासण्यासाठी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली होती.
स्थानिक पातळीवर सरकारने छाननी आणि तपासणी सुरु केल्याने दीड लाख महिलांनी आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, यासाठी अर्ज केले होते. त्यामुळे तब्बल 10 लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चारचाकी वाहनाच्या निकषाची कठोरपणे अंमलबजावणी केल्यानंतर सरकारकडून आता लाडक्या बहीण योजनेचे खरे लाभार्थी शोधण्यासाठी आणखी एका गोष्टीची मदत घेतली जाणार आहे. राज्य सरकारने लाभार्थी महिलांच्या आयकराबाबतची माहिती प्राप्तीकर विभागाकडून मागवली आहे. ही माहिती आल्यानंतर मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात अपात्र लाडक्या बहिणींची खरी संख्या समोर येणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्ज करेल त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र, निवडणूक संपल्यानंतर राज्य सरकारने पात्र महिलांची पडताळणी सुरु केली होती. त्यानंतर महिला विकास विभागाने पाच लाख लाडक्या बहिणींना योजनेसाठी अपात्र ठरवले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात ही योजना सुरु करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती.