आजकाल ऑनलाइन पेमेंटने (Online Payment) प्रत्येकाच्या आयुष्यात आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. रस्त्यापासून ते अगदी शोरूमपर्यंत तुम्ही युपीआयद्वारे (UPI) कोणतेही बिल भरू शकता. लोकांसाठी युपीआयची सुलभता आणि वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन आरबीआयने UPI Lite वापरकर्त्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने प्रत्येक व्यवहाराची मर्यादा 1,000 रुपये आणि एकूण मर्यादा 5,000 रुपये केली आहे. आरबीआयने सांगितले की UPI Lite साठी कमाल व्यवहार मर्यादा प्रति व्यवहार 500 वरून 1,000 रुपये करण्यात आली आहे. तसेच, एकूण मर्यादा 2,000 रुपयांवरून 5,000 रुपये करण्यात आली आहे.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आता UPI Lite च्या माध्यमातून एका व्यक्तीला जास्तीत जास्त 1,000 रुपये पाठवले जाऊ शकतात. युपीआय पेमेंटसाठी, वापरकर्त्याला युपीआय पिन आवश्यक आहे. मात्र UPI Lite द्वारे, स्मार्टफोन वापरकर्त्यांना युपीआय पिनशिवाय कमी किमतीचे व्यवहार करण्याची सुविधा मिळते. UPI Lite हा ग्राहक-अनुकूल दृष्टीकोन आहे, जो रिअल टाइममध्ये बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर अवलंबून नाही.
UPI Lite हे व्यक्ती-ते-व्यक्ती पेमेंट, व्यक्ती-ते-व्यापारी पेमेंट आणि लहान व्यापारी पेमेंटसाठी ऑफलाइन व्यवहारांना समर्थन देते. UPI Lite सह, वापरकर्त्याला पेमेंटसाठी ऑफलाइन डेबिटची सुविधा मिळते, परंतु क्रेडिटसाठी ऑनलाइन राहणे आवश्यक आहे. कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी किंवा इंटरनेट अनुपलब्ध अशा परिस्थितीत रिटेल डिजिटल पेमेंट सक्षम करणाऱ्या तंत्रज्ञानाची प्रायोगिक चाचणी आरबीआय करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
UPI Lite मर्यादित इंटरनेट किंवा कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागात खूप प्रभावी आहे. याशिवाय, UPI Lite चा वापर लोक घरगुती वस्तू खरेदी करताना किंवा रेस्टॉरंटमध्ये बिल भरताना मोठ्या प्रमाणावर करतात. UPI Lite ही मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या युनिफाइड पेमेंट इंटरफेसची (UPI) सोपी आवृत्ती आहे. हे वापरकर्त्यांना रिअल-टाइम इंटरनेट किंवा टेलिकॉम कनेक्टिव्हिटीशिवाय व्यवहार करण्याची सोय प्रदान करते. तसेच, ते जलद आणि सुरक्षित आहे कारण तिथे प्रमाणीकरणाच्या अतिरिक्त घटकाची (AFA) आवश्यकता नाही, ज्यामुळे प्रक्रिया जलद होते.