मोठी बातमी! अदानी ग्रुपवर 2,236 कोटी लाचखोरीचा आरोप,जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

भारतीय अब्जाधीश आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन न्यायालय आणि नियामकाने अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावरील हा आरोप कंपनीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल आहे. यानंतर, अदानी समूहाने गुरुवारी 600 दशलक्ष डॉलर्स किमतीचे बॉन्डही रद्द केल्याचे समजत आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने आपल्या एका अहवालात याचा उल्लेख केला आहे.

काय आहे प्रकरण?
अमेरिकन कोर्टाने गौतम अदानी यांनी कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी आणि ते लपवण्यासाठी $265 दशलक्ष डॉलर्स (₹2,236 कोटी) लाच दिल्याचा आरोप केला आहे. हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रीन एनर्जी आणि इतर कंपन्यांशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) यांनी अदानी समूहाचे काही अधिकारी आणि गौतम अदानी यांच्या कुटुंबातील काही सदस्यांवर हे आरोप केले आहेत. या आरोपात गौतम अदानी यांनी सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारत सरकारला 250 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचे म्हटले आहे.

गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप?
या आरोपात अदानी समूहाने अमेरिकन गुंतवणूकदारांकडून भांडवल उभे करून ते लपविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात सागर अदानी, विनीत अदानी, इंडिया रिन्यूएबल्स-एनर्जी कंपनी यांनाही आरोपी सांगण्यात आले आहे. न्यू यॉर्क कोर्टाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याची एक विशिष्ट योजना आखण्यात आली आहे जेणेकरून त्यांना अब्जावधी डॉलर्सचे कंत्राट मिळू शकेल.

अदानी समूहाकडून अद्याप प्रतिक्रिया नाही..
अदानी समूहाने स्वत:च्या फायद्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला आणि ऊर्जा करार जिंकण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना अयोग्य पेमेंट केले का, याचा तपास अमेरिकन अधिकारी करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अदानी समूहाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

250 मिलीयन डॉलरची लाचखोरी?
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप आहे. भारतात सौरऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी अदानी यांनी 250 दशलक्ष डॉलर्स लाच देण्याचे मान्य केले होते, असा आरोप आहे की अदानी यांनी लाचेची रक्कम गोळा करण्यासाठी अमेरिकन आणि परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलले. गौतम अदानी यांच्यासह आठ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

काँग्रेसकडून मोदी सरकारवर हल्लाबोल
अमेरिकेत अदानींवर आरोप झाल्यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, अदानी घोटाळ्याबाबत आम्ही सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहोत, पुन्हा एकदा जयराम रमेश यांनी जेपीसी चौकशीची मागणी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *