अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस कसून तपास करत असून दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. आरोपी मोहम्मद शहजाद याला 19 जानेवारीला अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो पोलिस कोठडीमध्ये आहे. आता त्याला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीवन कोठडी सुनावली आहे.
आरोपी मोहम्मद शहजादला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात हल्लेखोर मोहम्मद शहजाद याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी बांद्रा कोर्टात आरोपीला हजर केले असता पोलिसांनी आरोपीची तीन दिवस तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मागितलेली होती, मात्र बांद्रा कोर्टाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आरोपीच्या जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज करणार
आरोपीला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर आता आरोपीच्या वकिलांकडून दोन ते तीन दिवसांमध्ये आरोपीच्या जामिनासाठी सेशन कोर्टात अपील करण्यात येणार आहे. सैफ अली खान प्रकरणात पोलिसांनी फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंटचेरिपोर्ट अजूनपर्यंत कोर्टात सादर केलेले नाहीत. या सर्व गोष्टी ऐकल्याच्या नंतर कोर्टाने ही सुनावणी दिलेली आहे.