मोठी बातमी ! विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यावर जमा करणार 20 टक्के वाढीव पगार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळालं असून विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा होईल, असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. त्याआधी शिक्षकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचं महाजन यांनी सांगितलं. सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आझाद मैदानात जाऊन शिक्षकांची भेट घेतली होती.

राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना देण्यात आलेल्या आश्वासन सरकारने पूर्ण करावे, शाळांना 20 टक्के टप्प्याटप्याने अनुदान यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं आहे. आपल्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक होताच सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं.

अधिवेशन संपताच शिक्षकांच्या खात्यावर पैसे
गिरीश महाजन म्हणाले की, 18 तारखेला पावसाळी अधिवेशन संपेल. त्यावेळी तुमच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा झालेला असेल. मुख्यमंत्री हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत.

यापुढे पगाराची तारीख टळणार नाही
गिरीश महाजन म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्षकांसबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र थोड्या आर्थिक अडचणींमुळे मधल्या काही काळातील हफ्ते देण्यास उशीर झाला. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुणावरही विश्वास ठेऊ नका, तुमचे काम आम्हीच करणार आहोत. पुरवणी मागण्यांमधे आज मांडता आले नाही, मात्र इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही. इथून पुढे हा पगार नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होईल.”


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *