शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाकडून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. परंतु रविवारी रात्री उशिरा हे बंदचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सोशल मीडियातून जाहीर करण्यात आले. मात्र, परळी (Parli News) मात्र बंद राहणार असल्याचे आवाहन मराठा आंदोलक देवराव लुगडे महाराज यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केले आहे. परळी शहर बंदच ठेवावे असे आवाहन त्यांनी केले असून आता यानंतर परळी पोलिसांनी लुगडे महाराज यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याची माहिती आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बीडच्या दौऱ्यावर येणार आहेत. तर दुसरीकडे आज संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज बीड जिल्ह्यात काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maratha Kranti Morcha)

दरम्यान रविवारी खासदार बजरंग सोनवणे, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील, भाजपचे आमदार सुरेश धस, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे याची भेट घेतली. सोमवारी अजित पवार हे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय बी-बिल्डींग सर्जिकल वार्ड व नूतन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पणासाठी जाणार आहेत. ते शिवराज दिवटे याची भेट घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवराज दिवटे याला परळीतील टोकवाडी परिसरात रत्नेश्वर मंदिराच्या आवारात मारहाण झाली होती. दिवटे याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी अटक करण्यात आले असून पाच आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवराज दिवटे यांच्या मित्रांनी 16 तारखेला समाधान मुंडे, आदित्य गीते यांच्यासह मित्रांना मारहाण केल्याचा व्हिडिओ रविवारी समोर आला होता. त्यामुळे याप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

Beed News: गुन्हेगारांना जात नसते: नवनीत काँवत
शिवराज दिवटे प्रकरणात काही लोकांनी आरोपींच्या आडनावावरुन जातीय उल्लेख करत सोशल मीडियावर वादंग निर्माण केला आहे. गुन्हेगारांना जात नसते. कोणीही असे प्रकार करुन करिअर खराब करुन घेऊ नये. असे काही घडत असेल तर पोलिसांना कळवा. वादग्रस्त पोस्ट करु नये, अन्यथा गुन्हा दाखल करु, असा इशारा बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला.

Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीडच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी आहे. वाल्मीक कराड याच्या वकिलाकडून करण्यात डिस्चार्ज एप्लीकेशनवर युक्तिवाद होईल. तर विष्णू चाटेने लातूरहून बीडच्या कारागृहात अन्याच्या विनंती अर्जावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश रजेवर असल्याने कोणताही युक्तिवाद झाला नाही. त्यामुळे या प्रकरणाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आज या प्रकरणात बीडच्या न्यायालयात काय होते? याकडेच लक्ष लागले आहे. साधारण अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होईल.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *