मराठीच्या मुद्द्यावरुन मिरारोड-भाईंदर परिसरात मनसे सह शिवसेना ठाकरे गट व मराठी एकीकरण समिती संघटना मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
मराठीच्या मुद्द्यावरुन मीरा भाईंदर परिसरात मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे वातावरण प्रचंड चिघळले होते. काल रात्रीपासून पोलिसांकडून मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु होती. मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज मिरा भाईंदर परिसरात बालाजी हॉटेल सर्कल, मिरा रोड ते मीरा रोड स्टेशन असा मोर्चा काढण्याचे नियोजन होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत कलम 144 लागू केल्याने संतप्त वातावरण पाहायला मिळाले होते. मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठरल्यानुसार सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल चौकात जमायला सुरुवात झाले. पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा पाहायला मिळायला. या सगळ्यानंतर पोलिसांनी अचानक आपली भूमिका बदलत मराठी मोर्चाला परवानगी दिली. मात्र, मोर्चाचा मार्गात थोडासा बदल झाल्याचे समजते. हा मोर्चा मार्गस्थ झाला तरी त्याला अजूनही पोलिसांची परवानगी मिळालेली नव्हती.
बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन या मार्गाने मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्ते झेंडे घेऊन सहभागी झाले आहेत. मनसेचे नेते अभिजित पानसेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा आता शांतीनगर भागाच्या आसपास दाखल झाला आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर जैन आणि गुजराती लोकसंख्येचे प्रमाण जास्त झाला आहे. त्यामुळे शांतीनगरच्या वेशीवर स्वामी विवेकानंद रोडवर पोलिसांनी मोर्चा पुन्हा रोखला आहे. त्यामुळे मराठी आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आम्हाला पुढे सोडणार नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या मांडू, अशी भूमिका मराठी आंदोलकांनी घेतली आहे. मिरा रोड स्टेशन जवळील शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मारकाजवळ मोर्चा समाप्त होईल, अशी माहिती मिळत आहे.
आंदोलकांची धरपकड केली, पण जेल अन् गाड्या पुरल्या नाहीत
पोलिसांनी बालाजी हॉटेल चौकात मोठा बंदोबस्त ठेवला होता. याठिकाणी मराठी आंदोलक आल्यावर त्यांना पकडून गाडीत डांबले जात होते. मात्र, थोड्याथोड्यावेळाने कार्यकर्ते याठिकाणी येत होते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पकडण्यासाठी आलेल्या बेस्ट बसेस भरुन गेल्या. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना रिक्षातून पोलीस ठाण्यात आले. अखेर पोलीस ठाण्यात जागा न उरल्याने पोलिसांनी काही मराठी आंदोलकांना बँक्वेट हॉलमध्ये ठेवले होते.