मुंबई :- दि. 19 प्रतिनिधी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राच्या वतीने अंधेरी येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची 121 वी जयंती व संस्थेचा 47 वा वर्धापन दिन आयु. विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या प्रसंगी उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक व संपादक यांना 2023 चा मानाचा ‘कर्मवीर भूषण’ पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. रू. 10,000 /- रोख, मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देतांना उत्तम कांबळे म्हणाले कि, संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य वाखाण्यासारखे आहे. माझ्या कार्याचा गौरव करून मला दादासाहेबांच्या नावाने कर्मवीर भूषण पुरस्कार दिला, या बद्दल मी संस्थेचा आभारी आहे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे वर्षाताई गायकवाड, आमदार, अध्यक्ष, मुंबई प्रदेश काँग्रेस या उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या कि, तरूण पिढीचा बाबासाहेबांच्या विषयी अभ्यास नाही. त्यामुळे ते चळवळीत सक्रीय भाग घेत नाही. किंबहुना त्यांना सामाजिक चळवळी बद्दल आस्था नाही. कुठल्याही कार्यक्रमास गेले तर तरूण वर्गाची उपस्थिती नगण्य असते. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असून त्यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण केली पाहिजे. त्यांना डॉ. बाबासाहेब, दादासाहेब समजले पाहिजेत. तरच समाज गतीमान होईल. या प्रसंगी विशेष पाहुणे मा. संजय निरूपम, माजी खासदार व श्री. राजेश शेटये उपविभाग प्रमख शिवसेना (उबाठा) यांचे प्रसंगानुरूप मार्गदर्शनपर भाषणे झाली.
सुरवातीला पाहुण्यांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले व बुध्द वंदना घेण्यात आली. आयु. चंद्रकांत बच्छाव, सरचिटणीस यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर अध्यक्ष विजय जाधव यांना त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. त्यानंतर संस्थेचा यथोचित परिचय करून देतांना चंद्रकांत बच्छाव पुढे म्हणाले कि, संस्थेत शोषित, वंचित व दुर्बल घटकांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. विशेषतः लोकसेवा/राज्यसेवा परीक्षेचे प्रशिक्षण वर्ग, 10 वी च्या मुलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग व संगणकाचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. तसेच सुभेदार रामजी आंबेडकर ग्रंथानीयुक्त वाचनालय असून एकाच वेळी 50 विद्यार्थी अभ्यास करतात.
शेवटी आयु. नितिन सोनावणे, उपाध्यक्ष यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानल्या नंतर अध्यक्षांच्या परवानगीने सभा समाप्त करण्यात आली.