साधारण इ.स.२००३ ची गोष्ट. माझा सांगलीचा मित्र पहिल्यांदाच नागपूरला आला होता. त्याला पी.एच.डी. साठी व्ही.एन.आय.टी. ला (पूर्वीचे व्ही.आर. सी. ई.) प्रवेश मिळाला होता. संपूर्ण बालपण आणि अर्धे तारूण्य पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात घालवून तो पहिल्यांदाच नागपूरला आला होता.
महाराष्ट्र एक्सप्रेसने २७ तास प्रवास करून तो स्टेशनवर उतरला. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सवयीने त्याने ऑटोरिक्षाला (नागपुरी ऍटो) हात केला.
मित्र: अरे, व्हीआरसीई ला जायचय.
ऑटोवालाः चला न साहेब. भाड्याचे ३०० रूपये होतील.
पश्चिम महाराष्ट्रातल्या छान, व्यवस्थित निगा राखलेल्या रिक्षा पाहिलेल्या माझ्या मित्राला नागपुरचे जुने, फ्रंट इंजिन, फाटकेतुटके ऑटो पाहून कसेसेच झाले होते. तो आधीच थोडासा फटकळ स्वभावाचा. ३०० रूपये भाडे ऐकून तो वैतागून म्हणाला.
मित्रः अरे, मी भाडे विचारले रे. तुझ्या ऑटोरिक्षाची किंमत नाही. मला फक्त व्हीआरसीईला जायचय. ऑटो विकत नाही घ्यायचाय.
रिक्षावालाही भडकला.
संपूर्ण जगात ऑटो रिक्क्षांना एकवेळ टर्बोचार्ज्ड एंजिन बसेल, तो ऑटो हवेतून उडण्याचे तंत्रज्ञानही विकसित होईल पण नागपूरचे ऑटोवाले आपला हटवादी स्वभाव बदलणार नाहीत.
विदर्भात चंद्रपूर आणि यवतमाळलाही वैदर्भिय ऑटोवालेच आहेत. पण त्यांची वृत्ती मुंबईकर किंवा (पुणे सोडून उर्वरित) पश्चिम महाराष्ट्रकरांसारखी आहे. ऑटो जेवढा चालत राहिल तेव्हढा फायदा हे त्यांना कळलेय. आणि तसे ते चालवतातही. पण नागपूरच्या ऑटोवाल्यांचा ऍटीट्यूड म्हणजे “इतक्या कमी भाड्यात ऑटो चालवून केवळ प्रवाशांवर परोपकार करतोय” असाच आहे. समजा एखाद्या प्रवाशाने गणेशपेठ बसस्थानक ते बर्डी किंवा रेल्वे स्टेशन ते बर्डी प्रवासाचे २०० रूपये भाडे जरी कबूल केले तरी यांची कमी भाड्याची कुरकूर कायम राहणार.
पुण्यातल्या रिक्षावाल्यांबद्दल काय बोलावे. सामान्य पुणेकराविषयी बोलताना जर दहादा विचार करावा लागत असेल तर पुणेकर रिक्षावाल्यासंबंधी बोलण्यापूर्वी हजारदा विचार करावा. आधीच पुणेकर त्यात तो रिक्षा चालवणार. (कुणीही “आधीच मर्कट त्यात तो मद्य प्याला” या धर्तीवर हे वाक्य वाचू नये, कृपया) पुल म्हणतात तसे चळवळ चालवावी तसे हे पुण्यात रिक्षा चालवतात.
असो, एकदा पुण्याचे वर्णन केले की इतर अलम दुनियेचे वर्णन फिके ठरते त्यामुळे ऑटो पुराणाला इथेच विराम देणे इष्ट.
– स्वतःची कार घेऊन प्रवास केला तर साधारण ४ वर्षातच ऑटोच्या भाड्याइतके पैसे वसूल होतात हे सत्य ११ वर्षांपूर्वी उमगलेला, रामभाऊ ड्रायव्हर