छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 वर्षीय विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न, शरीरावर 15 पेक्षा जास्त वार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर 36 वर्षीय विवाहितेने आरडाओरडा सुरू केल्याने विकृताने तिच्यावरती चाकूने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिचा चेहराही विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेक तात्याराव नवपुते (19, रा. घारदोन) असे विकृताचे नाव आहे, चिकलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?
हा नराधम विकृत गेल्या अनेक दिवसांपासून त्या महिलेचा पाठलाग करत होता. विवाहितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 2 मार्च रोजी विवाहिता सायंकाळी शेतात काम करीत होती. त्यावेळी विकृताने शेतात जाऊन तिचा गळा दाबला व तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने त्याला तीव्र विरोध केला. त्यावेळी नराधमाने तिचा गळा पकडून तिला जमिनीवर आपटलं. तिचा चेहरा, पोट, मान, हात, डोक्यात चाकूने 15 पेक्षा जास्त वार केले. त्यानंतरही त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, विवाहिता बेशुद्ध पडल्याने तिच्या डोक्यात दगड घालून ती मृत झाल्याचे समजून तो पसार झाला.

तर शेताच्या दुसऱ्या टोकाला असलेली सासू घरी निघाल्यानंतर तिला रस्त्यामध्ये सून रक्तबंबाळ, बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर कुटुंबाने तिला शहरात रूग्णालयात उपचारांसाठी आणले. गजानन महाराज मंदिर परिसरातील एका रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सोमवारी रात्री शुद्धीवर आल्यावर तिने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर अभिषेकवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या शरीरावर तब्बल 52 टाके पडल्याचे पोलिसांनी सांगितले.

विवाहिता मृत झाल्याचे समजून अभिषेक निघून गेला. सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तो गाव परिसरातील शेतात लपून बसला होता. अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपअधीक्षक पूजा नांगरे यांनी कारवाईच्या सूचना केल्या. निरीक्षक रविकिरण दरवडे, उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी शोध घेत त्याला शेतातून अटक केली. रक्तबंबाळ अवस्थेतही तो तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करत होता. महिला बेशुद्ध पडली तेव्हा तिच्या डोक्यात दगड घालून तो पसार झाला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *