प्रेयसीच्या चितेवर उडी मारून तरुणाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, नागपूरमधील घटना

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

प्रेमभंगाच्या वेदनेत विव्हळलेल्या तरुणाने थेट प्रेयसीच्या चितेवर उडी मारून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत उपस्थितांनी त्याला रोखले आणि चांगलाच चोप दिला. यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला. सध्या तो आयसीयूमध्ये जीवन-मरणाच्या संघर्षात आहे. ही थरारक घटना कामठीतील कन्हान नदीच्या शांती घाटावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग मेश्राम असं त्या तरुणाचे नाव आहे. अनुरागचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र अलीकडे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. यामध्ये त्या तरुणीला नैराश्य आलं आणि तिने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिस ठाण्यात भारत न्याय संहिता कलम 194 (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सोमवारी सायंकाळी 4 वाजता कन्हान नदीच्या शांती घाटावर अंत्यसंस्कार सुरू होते. त्यावेळी अनुराग मेश्राम हा दारूच्या नशेत घटनास्थळी आला. भावनेच्या भरात त्याने प्रेमिकेच्या मृतदेहावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित लोकांनी त्याला रोखले आणि जबर मारहाण केली. या मारहाणीत तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याचे वडील राजेंद्र मेश्राम आणि मोठा भाऊ पवन मेश्राम यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले.

या घटनेनंतर सहाय्यक पोलिस उपायुक्त विशाल क्षीरसागर, कामठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. अनुराग मेश्राम शुद्धीवर आल्यावर पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *