मंत्रीपद मिळाल्यापासूनच वादाची किनार लाभलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. थेट विधिमंडळामध्येच जंगली रमी गेम खेळतानाचा आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना जंगली रमीच्या व्हायरल व्हिडिओवर उत्तर देताना चांगलाच दम लागल्याचे दिसून आले. कोकाटे यांनी आपल्या व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले की, मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो त्यावेळी कनिष्ठ सभागृहात काय चाललय पाहण्यासाठी youtube प्ले करत होतो. मात्र युट्युब प्ले करत असतानाच जाहिरात आली, ती जाहिरात स्कीप करताना दोन-तीन सेकंद लागले. तुम्हाला तशी जंगली रमी जाहिरात येत नाही का? असा उलट सवाल कोकाटे यांनी केला.
मी काही पाप केलं नाही
कोकाटे यांनी आपला बचाव करताना मी काही पाप केलं नसल्याचे म्हणाले ते म्हणाले. मी जाहिराती स्किप करत होतो त्यामध्ये दोन-तीन सेकंद लागले ते त्यांना दाखवायचं नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेला कामावरती ते बोलत नाहीत. माझं काम पारदर्शकपणे असल्याने मी कशाला अशा पद्धतीने गेम खेळत बसू असं सावरासारव माणिकराव कोकाटे यांनी केली. ते म्हणाले की माझ्या काही लक्षात आलं नाही. दुसऱ्या सेकंदाला मी जाहिरात स्कीप केली. मात्र तेवढाच व्हिडिओ दाखवून टार्गेट करण्यात आल्याचे कोकाटे यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला जंगली रमीची जाहिरात येत नाही का?
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही कोकाटे बोलले. ते म्हणाले की आम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही का? त्यासाठी आम्ही दौरे करत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहोत. मात्र, लोकांना बदनाम करण्यासाठी डाव असल्याचे कोकाटे म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये विशेष असे काय आहे, तुम्हाला जंगली रमीची जाहिरात येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्येही अशा जाहिराती येतात. मात्र ते स्वतःची करमणूक करून घेत असल्याचे ते म्हणाले.
माझ्या विभागासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे.
दरम्यान, भाजपला विचारून काम करावे लागते या टीकवर ते म्हणाले की कारण नसताना टार्गेट केलं जात आहे. मी आता कोणत्याही प्रकारचे विधान केलेले नाही. माझ्या विभागासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. या गोष्टीला एवढं महत्त्व का द्यावं? असा सुद्धा सवाल माणिकराव कोकाटे यांनी केला. ते म्हणाले मीडिया इतकं डोक्यावर का घेत आहेत? दरम्यान, संजय राऊत यांनी अमित शाह चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे ठरवले असल्याचा दावा केला आह. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचे सुद्धा नाव असल्याचे राऊत म्हणाले. या संदर्भात विचारलं ते म्हणाले की त्या संजय राऊतला माहित असेल मला काय माहित नाही.