अमेरिकेने चीन विरोधात उचलल मोठ पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय चीन आणि अमेरिकेमधील व्यापारी तणावाने पुन्हा एकदा टोक गाठलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी धमकी दिली. नंतर थेट व्हाइट हाऊसने चीनवर 104 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. हे आयात शुल्क 9 एप्रिलपासून लागू होणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाकडे दोन्ही देशातील नव्या आर्थिक युद्धाची सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटलेलं की, चीनने अमेरिकेवर लावलेला 34 टक्के टॅरिफ मागे घेतला नाही, तर अमेरिका सुद्धा त्यांच्यावर 50 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावेल. आता व्हाइट हाऊसने आपली धमकी प्रत्यक्षात आणली आहे. अमेरिकेने चिनी सामानाच्या आयातीवर थेट 104 टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. हा निर्णय 9 एप्रिलपासून लागू होईल, असं व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलय की, “जो कुठला देश अमेरिकेविरुद्ध प्रत्युत्तराची कारवाई करेल, त्यांच्याविरुद्ध तात्काळ प्रभावाने नवीन आणि आधीपेक्षा जास्त कठोर टॅरिफ लावला जाईल” “आम्ही आधीच स्पष्ट केलेलं की, व्यापारात भेदभाव सहन करणार नाही. आता वेळ आलीय, चीनने आपल्या धोरणांचा पुनर्विचार करावा आणि अमेरिकेसोबत चांगला व्यवहार करावा” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
विश्लेषकांच म्हणणं काय?
अमेरिका आणि चीनमधील प्रस्तावित बैठका स्थगित केल्याचही ट्रम्प यांनी सांगितलं. ज्या देशांनी व्यापारी चर्चेची मागणी केली आहे, त्यांच्यासोबत अमेरिका चर्चा सुरु करेल असही ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होईल तसच चीनसोबत अमेरिकेच्या संबंधात आणखी तणाव निर्माण होईल असं विश्लेषकांनी सांगितलं.
चीनच पुढचं पाऊल काय असेल?
चीनकडून अमेरिकेच्या या निर्णयावर अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. बीजिंग लवकरच यावर प्रतिक्रिया देईल असं बोललं जातय. चीन सुद्धा अमेरिकेच्या या टॅरिफ निर्णयाविरोधात कठोर पावलं उचलू शकतो, असं एक्टपर्ट्सनी सांगितलं. त्यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार युद्ध आणखी तीव्र होणार आहे. सहाजिकच याचा जागतिक व्यापारावर, गुंतवणूकीवर परिणाम होईल. चीनच पुढचं पाऊल काय असेल? याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे टॅरिफ धोरण जगाला मंदीकडे घेऊन जाणारं पाऊल आहे, अस सुद्धा काही विश्लेषकांच मत आहे.