ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे नामांकित सदस्य म्हणून चार प्रतिष्ठित (The President of India Rajya Sabha Nomination) व्यक्तींची नियुक्ती केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 80(1)(a) अंतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे देशाच्या कायदेमंडळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञता आणण्याची संधी मिळते. या चार नावांमध्ये कायदा, परराष्ट्र धोरण, शिक्षण आणि इतिहास अशा विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
1. कसाबचा खटला लढवणारे उज्ज्वल निकम- (Who is Ujjwal Nikam)
उज्ज्वल निकम देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सरकारी वकिलांमध्ये गणले जातात. उज्ज्वल निकम यांनी 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून खटला, प्रमोद महाजन खून, 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबचा खटला आणि 2016 च्या कोपर्डी बलात्कार खटल्यासारख्या अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये खटल्याचे नेतृत्व केले आहे. उज्ज्वल निकम यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उज्जवल निकम यांना भारतातील न्यायव्यवस्थेच्या ताकदीचे प्रतीक मानले जाते.
2. सी. सदानंदन मस्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ (Who Is C. Sadanandan Maste)
सी. सदानंदन मस्ते केरळमधील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. ते राष्ट्रीय शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि ‘नॅशनल टीचर्स न्यूज’चे संपादक देखील आहेत. 1994 मध्ये राजकीय हल्ल्यात दोन्ही पाय गमावले असले तरी, सी. सदानंदन मस्ते यांनी समाजसेवा आणि शिक्षणाला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. त्यांच्या नियुक्तीकडे सामाजिक सेवेतील योगदानाचे कौतुक म्हणून पाहिले जात आहे.
3. कोण आहेत हर्षवर्धन श्रृंगला? (Who Is Harsh Vardhan Shringla)
हर्षवर्धन श्रृंगला माजी परराष्ट्र सचिव आहेत. हर्षवर्धन श्रृंगला 1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत. हर्षवर्धन श्रृंगला यांनी अमेरिका, बांगलादेश आणि थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. ते २०२० ते २०२२ पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव होते आणि भारताच्या धोरणात्मक परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे. अलिकडेच, हर्षवर्धन श्रृंगला भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात मुख्य समन्वयक म्हणून भूमिका बजावली.
4. इतिहासकार आणि शिक्षिका डॉ. मीनाक्षी जैन (Who Is Meenakshi Jain)
डॉ. मीनाक्षी जैन प्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षिका आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये इतिहास शिकवला आहे आणि भारतीय सांस्कृतिक वारशावरील त्यांच्या संशोधन कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. मीनाक्षी जैन ‘सती’, ‘राम आणि अयोध्या’ आणि ‘देवतांची उड्डाण’ यासारख्या प्रसिद्ध पुस्तकांच्या लेखिका आहेत. 2020 मध्ये मीनाक्षी जैन यांना पद्मश्रीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मीनाक्षी जैन भारतीय इतिहास आणि परंपरांवरील संशोधनासाठी ओळखल्या जातात.