अजित पवार-शरद पवार यांची भेट,काय घडल नेमक या भेटीमध्ये?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अजित पवारांच्या समवेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमि मुलगा देखील होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे नेते देखील त्यावेळी उपस्थित होते. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्याची माहिती यावेळी भेटीसाठी आलेल्या नेत्यांनी दिली आहे. दरम्यान अजित पवार आणि इतर नेते जेव्हा शरद पवारांच्या भेटीला गेले तेव्हा, सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे आणि पती सदानंद सुळे हे हॉलबाहेर थांबले होते अशा चर्चा होत्या, याबाबत शरद पवारांचे नातू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते युगेंद्र यांनी माहिती दिली आहे.

ज्यावेळी अजित पवार आणि नेते शरद पवारांना भेटण्यासाठी आत आले तेव्हा रेवती सुळे आणि सदानंद सुळे हे मात्र आतमध्ये नव्हते ते हॉलच्या बाहेर थांबले होते, रेवतीचा राग आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना युगेंद्र पवार म्हणाले, ‘असं अजिबात नाही. रेवतीचा यामध्ये काय संबंध. ती माझी लहान बहीण आहे. ती कुठेतरी किचनमध्ये नाश्ता करत होती. ती तिथेच शेजारी होती बाकी असं काही नाही असेही पुढे युगेंद्र पवार म्हणालेत.

आमच्या कुटुंबाने नेहमी कौटुंबिक संबंध…
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार म्हणाले, अजित पवार भेटीसाठी येणार होते हे मला माहिती नव्हतं आणि आमच्या कुटुंबाने नेहमी कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवले आहेत. ते शेवटी साहेब आहेत. आज त्यांचा 85 वा वाढदिवस आहे. त्यांना जाऊन भेटलं पाहिजे त्या भावनेने अजित पवार आले असतील, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाचे जेष्ठ नेते होते ते आता अजित पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते वाढदिवसासाठी भेटण्यासाठी आले असावेत असेही युगेंद्र पवार यावेळी बोलताना म्हणाले.

कुटुंब नेहमी एकत्र आले पाहिजे…
निवडणुका झाल्या, त्यामध्ये आम्ही आमची पातळी सोडली नाही, आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असला पाहिजे. आपले विचार हे वेगळे असले पाहिजेत. विचार आता वेगळे झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आले पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. असा एक आपला प्रयत्न असेल असंही युगेंद्र पवार पुढे म्हणाले आहेत.

आजची भेट ही शंभर टक्के कौटुंबिक…
आजची भेट ही शंभर टक्के कौटुंबिक आहे. बाकी काहीही नाही असे त्यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केला आहे. अजित पवार यांच्यासोबत आलेले त्यांच्या पक्षाचे नेते हे काही मंत्री होणार आहेत, काही खासदार आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर ठेवून फक्त कुटूंबाने भेटणं हे पण बरोबर नाही. त्यांना बाहेर थांबून ठेवणं योग्य नाही. त्यामुळे सर्वजण शरद पवारांना भेटण्यासाठी गेले होते. अजित पवार सुनेत्रा पवार त्याचबरोबर पक्षाचे काही ठराविक नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासोबत अनेक नेते होते अशी माहिती यावेळी युगेंद्र पवार यांनी दिली आहे.

युगेंद्र पवार म्हणतात, आता पाडवा एकत्रच?
पुर्वीपासून आमचं पवार कुटूंब असंच आहे. आम्ही भेटत असतो. आधीही वेगवेगळ्या विचारांचे लोक आमच्या कुटुंबात होती ते देखील प्रत्येक कार्यक्रमाला समारंभाला वाढदिवसाला एकत्रित येत होती. आताही एकत्रित येत आहेत. आम्ही आत्तापर्यंत राजकारण एकाच बाजूला ठेवत आलोय आणि कौटुंबिक संबंध हे एका बाजूला असले पाहिजेत. हा वारसा ही परंपरा शारदाबाई पवार यांनी सुरू केलेले आहे त्याचप्रमाणे आपण आम्ही सर्वजण पुढे जात आहे. यावर्षी निवडणुका आणि दिवाळी पाडवा एकत्र आले त्यामुळे त्यांनी वेगळा पाडवा घ्यायचा निर्णय घेतला असेल. पण, पुढच्या वर्षी एखाद्या वेळी पाडवा आम्ही एकत्रित घेऊ असं मोठं वक्तव्य युगेंद्र पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.

कोणकोणत्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार, सुपुत्र पार्थ आणि जय पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *