वैष्णवीनंतर पुण्यातही तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न,काय आहे प्रकरण?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे, वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका विवाहितेची मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे, पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवानं या घटनेत तिचा जीव वाचला आहे. त्यानंतर विवाहितने दाखल केलेल्या तक्रारीवरून पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार तीचं अजय पवार यांच्याशी 22 मे 2022 रोजी लग्न झालं, लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यातच अजय पवारने घरगुती कारणावरून आपल्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केली, यानंतर सासूने देखील पीडितेला “तु माहेरावरुन काय आणले आहेस? तुझ्या आई बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही” असं म्हटलं.

त्यानंतर पती अजय पवार हा देखील पीडितेला “मी तुझ्याशी टाईमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे, मला चारचाकी गाडी घेवून देण्यास सांग तुझ्या बापाला,” असं म्हटंला. पीडितेनं गाडी घेऊन देण्यास नकार दिला. दरम्यान गाडीला नकार दिल्यानंतर पतीने आपला गळा दाबून मारहाण केली, तसेच दीर मनोज पवार याने देखील आपल्याला शिवीगाळ केली असा आरोप या घटनेतील पीडितेनं केला आहे.

21 मे रोजी पीडितेच्या सासूने पुन्हा एकदा तिला त्रास दिला, “पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले तसेच तुलाही बाहेर काढीन,” अशी धमकी सासूने तिला दिली. “तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही तू घरात आल्यापासून शांतता नाही,” असं हिणवलं. हा त्रास सहन न झाल्याने या तरुणीने रागाच्या भरात झुरळ मारण्याचं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवानं या घटनेत या पीडितेचा जीव वाचला आहे, त्यानंतर तिने दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात पीडितेचा पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती या प्रकरणात पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान 16 मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या तरुणीने गाळफास घेऊन आत्महत्या केली, या प्रकरणात तिचा पती, सासरा, सासू आणि दीर यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यात आणखी एक अशीच घटना समोर आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *