इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने काल (7 मे) कसोटीमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली.शल मीडियावर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले.
रोहित शर्माने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर सर्व चाहते भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार कोण होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदासाठी भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याचं नाव निश्चित मानलं जात आहे.शुभमन गिल कसोटी क्रिकेटचा कर्णधार होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघ निवडला जाईल तेव्हा या बैठकीत नव्या कसोटी कर्णधाराचाही निर्णय होईल. शुभमन गिलसह जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल आणि ऋषभ पंत हे कर्णधारपदाच्या शर्यतीत होते.अखेर शुभमन गिलच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, इन्स्टाग्रामवर कसोटी कॅपसह फोटो शेअर करीत रोहितने लिहिले, ‘सर्वांना नमस्कार…मी केवळ शेअर करू इच्छितो की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या जर्सीत देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी फार सन्मानाची बाब ठरली, असं रोहित शर्मा म्हणाला.इतकी वर्षे दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी वनडेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्माची कसोटी कारकीर्द कशी राहिली?-रोहित शर्मा याने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. रोहितने तेव्हापासून गेली 12 कसोटी संघांचं प्रतिनिधित्व केलं. तसेच रोहितने या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. रोहितने 67 कसोटी सामन्यांमधील 116 डावांमध्ये 57.08 या स्ट्राईक रेटने आणि 40.58 च्या सरासरीने 4 हजार 302 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 88 षटकार आणि 473 चौकार लगावले. रोहितने 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 18 अर्धशतकं, 12 शतकं आणि 1 द्विशतक झळकावलं होतं. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.