बदलापुरात दोन चिमुरड्यांवरील अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर झाल्यानंतर आता बदलापूर रेल्वे स्थानकात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाने पेढे भरवत, फटाके वाजवत आनंद उत्सव साजरा केला. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर बदलापुरातही आनंदाचे वातावरण होते. बदलापुरातील घटनेनंतर मोठा जनआक्रोश बदलापूर स्थानकात पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता त्याच रेल्वे स्थानकांवर एन्काऊंटर प्रकरणी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पेढे वाटपही करण्यात आले.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणं गरजेचं
तर दुसरीकडे बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचे पालकांनीही स्वागत केले. आमच्या मुलींना न्याय मिळाला, आम्ही समाधानी आहोत, असे मत काही पालिकांना व्यक्त केले. राजकारण कितीही झालं तरी त्यांच्या दृष्टीने ही कारवाई योग्य होती. पोलिसांनी तात्काळ केलेल्या या कारवाईमुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे, असे मत पालकांनी व्यक्त केले.
बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर झाल्यानंतर अनेक महिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला आनंद झाला आहे की आज नराधमाचा अंत झाला. आता भविष्यामध्ये अशा घटनांमध्ये कमी येईल अशी आशा आहे, अशा प्रतिक्रिया महिला देत आहेत. बदलापुरातील महिलांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त करत केली जात आहे. तसेच या महिलांनी पोलिसांचेही आभार मानले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अक्षय शिंदे हा सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात होता. यानंतर तपासासाठी ठाण्यातील पोलीस अधिकारी ट्रान्सफर वॉरंट घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते.
काल संध्याकाळी 5.30 च्या सुमारास आरोपी अक्षय शिंदेला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला ठाणे येथे घेऊन जात असताना संध्याकाळी 6.00 ते 6.15 दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा बायपास येथे आले. यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले. यानंतर पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 1 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला. त्यानंतर त्याने 2 राऊंड इतरत्र फायर केले.
यानंतर स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली. ही गोळी आरोपी अक्षय शिंदेंला लागली आणि तो जखमी झाला. यानंतर पोलीस पथकाने तात्काळ अक्षय शिंदेला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी आरोपी अक्षय शिंदेला मृत घोषित केले.