अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आग्र्यावरुन पेटाऱ्यात बसून नव्हे तर लाच देऊन सुटले होते, अशा आशयाचे वक्तव्य सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी केले होते. यावरुन अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोलापूरकर यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. राहुल सोलापुरकर ह्याने आपण टकलु “हैवान” असल्याच सिद्ध केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेले वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणुन कधीच खपवून घेतली जाणार नाही, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातुन स्वकर्तुत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल, असे अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाडांची सोलापुरकरांवर जोरदार टीका
हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राहुल सोलापूरकर यांचे डोकं फिरलंय, त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा: सचिन खरात
राहुल सोलापूरकर यांनी रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे. मुळात यांच्या मनातच बहुजन राजांबद्दल द्वेष आहे, हे त्यांच्या वक्तव्यातून जाणवते. पण आता भाजपा सरकार आल्यापासून यांच्या मनातील खरे विचार उफाळून येत आहेत. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांची ब्राह्मणवादी मानसिकता बाहेर आली आणि राहुल सोलापूरकर यांचे डोकं फिरलंय. त्यांना ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, अशी टीका सचिन खरात यांनी केली.
राहुल सोलापुरकर नेमकं काय म्हणाले?
अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी अलीकडे एक यूट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले की, शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो…”, असे राहुल सोलापुरकर यांनी मुलाखतीत म्हटले होते.
यासंदर्भात राहुल सोलापूरकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, पॉडकास्ट आधी ऐका आणि ज्याला त्याला त्यावर काय मत व्यक्त करायचे आहेत ते मत व्यक्त करायला मोकळे आहेत. मला यात पडायचं नाही, अशी प्रतिक्रिया राहुल सोलापुरकर यांनी दिली.