नवी मुंबईत तब्बल साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकास एसीबीच्या टीमने रंगेहाथ पकडलं आहे. नवी मुंबईतील एन. आर. आय. सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना एसीबीच्या मुंबई युनिटने रंगेहाथ साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करणे, तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली 5 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांनी तडजोडीअंती 4 लाखांची लाच घेण्याचं मान्य केलं होतं. या प्रकरणी लाच देणाऱ्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीकडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी याआधी देखील इमारत दुर्घटनेत अटक करण्यात आलेल्या तक्रारदराच्या वडिलांना गुन्ह्यात मदत आणि जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल 14 लाख रुपये घेतल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. या प्रकरणी एसीबीकडून पुढील तपास केला जातोय.
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांच्या विरोधात नवी मुंबईतील एन. आर. आय सागरी पोलीस ठाणे येथे इमारत पडली म्हणून गुन्हा दाखल आहेत. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या तक्रारदाराचे वडील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. नमूद गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरीता आणि जामीन मिळवून देण्याकरीता एन. आर. आय. सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश संभाजी कदम यांनी तक्रारदाराकडे प्रथम १२ लाख आणि त्यानंतर २ लाख रुपये अशा रक्कमेची मागणी करुन ते त्याच्याकडून यापूर्वीच स्विकारले होते.
त्यानंतर तक्रारदाराच्या वडिलाच्या विरोधात एन. आर. आय. मार्ग पोलीस ठाणे येथे या महिन्यात 2 ऑक्टोबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदाराच्या वडीलांचा ताबा न घेण्याकरीता, अटक न करण्याकरीता आणि गुन्ह्यात मदत करण्याकरीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी तक्रारदाराकडे तब्बल 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. पण तक्रारदाराची सतीश कदम यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने 8 ऑक्टोबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई येथील कार्यालयात येवून लेखी तक्रार दिली.
नमूद तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान सतीश कदम यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती 4 लाख रुपये इतक्या रक्कमेची लाच स्वरूपात मागणी करून ती स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तात्काळ करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान सतीश कदम यांना तक्रारदाराकडून साडेतीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. म्हणून त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी एसीबीकडून पुढील तपास सुरु आहे.