लेखणी बुलंद टीम:
बिहार मधील पूर्व चंपारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी एका 22 वर्षीय तरुणाच्या पोटातून दोन चाव्या, चाकू आणि नेल कटर काढले आहे. तरुणाने आणखी अनेक धातूच्या वस्तू गिळल्या होत्या. तरुणाला काही दिवसांपूर्वी पोटात तीव्र वेदना होत होत्या. यानंतर तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एक्स-रे रिपोर्टमध्ये झाला धक्कादायक खुलासा –
तरुणावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे प्रमुख डॉ. अमित कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘मानसिक उपचार घेत असलेल्या तरुणाला पोटोत वेदना होत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयात आणले होते. एक्स-रे रिपोर्टमध्ये त्याच्या पोटात धातूसारख्या वस्तू आढळल्या, त्यानंतर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला आम्ही शस्त्रक्रियेदरम्यान, दोन चाव्या काढल्या.’
पोटात सापडला चार इंची चाकू –
डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीला शस्त्रक्रियेदरम्यान चावीचा छल्ला काढण्यात आला. त्यानंतर रुग्णाच्या पोटातून एक चार इंच लांब चाकू आणि दोन नेल कटर काढण्यात आले. आम्ही त्या तरुणाला विचारले असता त्याने अलीकडेच धातूच्या वस्तू गिळण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. आता तरुणाची प्रकृती ठीक असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.