कल्याणमधील नांदिवली परिसरात एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण (Kalyan Crime News) करण्यात आली. याप्रकरणी परप्रांतीय आरोपी गोकुळ झा या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत झा यांचा ठावठिकाणा शोधून काढत मनसेचे कल्याण उपशहराध्यक्ष योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे यांनी अंबरनाथच्या नेवाळी परिसरातून गोकुळ झा याला ताब्यात घेऊन, त्यांनी थेट डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात आणलं.
नांदिवली परिसरातल्या एका खाजगी रुग्णालयात गोकुळ झा नावाच्या तरुणानं रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केली या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. संबंधित डॉक्टरांकडे काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बसले होते. त्यामुळं रिसेप्शनिस्टनं गोपाल झा नावाच्या तरुणाला थांबण्यास सांगितलं. पण तो तरुण जबरदस्तीनं डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रिसेप्शनिस्टनं अडवलं असता त्या तरुणानं तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिचे कपडे फाटले आणि तिला जबर दुखापत झाली.
डॉक्टरांची धक्कादायक माहिती-
सदर मराठी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जानकी रुग्णालयाचे डॉक्टर मोईन शेख यांनी म्हटलं की, तिच्या मानेवर मारहाण करण्यात आली आहे. तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत. तसेच तरुणीला मान हलवताना खूप वेदाना होत आहे. त्यामुळे या मारहाणीमुळे तिला पॅरालिसीस होण्याची शक्यता आहे. तरुणीला सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
परिसरामध्ये फेरीवाल्याकडून गोकुळ झा हप्ते वसुली करत असल्याचा आरोप-
कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गोकुळ झा याला मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे सह दीपक करांडे या पदाधिकाऱ्यांनी नेवाळी परिसरांमधून या आरोपीला ताब्यात घेऊन मनसे स्टाईलने त्याला मारझोड देखील केल्याची माहिती योगेश यांनी दिली. गोकुळ झाला योगेश गव्हाणे आणि त्यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले गोकुळ झाचा भाऊ रंजीत झा याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आज कल्याण न्यायालयात या आरोपींना हजर करण्यात येणार असून गोकुळ झा हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे. याच्यावर कल्याण कोळशेवाडी उल्हासनगर या परिसरात दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्याकडून गोकुळ झा हप्ते वसुली करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याची चौकशी करून त्याला कठोर शिक्षा कशी होईल यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.