जिल्ह्यातील एका तरुणाला नोकरीच्या आमिषाने युरोपमध्ये नेऊन त्याची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उमेश किसन धोडी असे पीडित तरुणाचे नाव असून तो पालघरमधील बच्चू मिया चाळ येथे राहतो. त्याने मनसेच्या तुलसी जोशी यांच्याशी संपर्क साधला असून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्याची व्यथा मांडली. त्यामध्ये रडताना दिसत असून त्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
उमेश धोडी याला वडोदरा येथील IOR कंपनीच्या माध्यमातून युरोपमधील अल्बानिया या देशात ‘अमेक सोल्युलर ग्रुप’ या कंपनीमध्ये नोकरी देण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून नियमांनुसार कोणतीही सुविधा न मिळाल्याने त्याने आक्षेप घेतला असता, त्याला तिथून कामावरून काढण्यात आले.
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल
IOR कंपनीचा एजंट रफिक घाची याने युरोपमध्ये चांगली नोकरी देतो असे सांगून उमेशची फसवणूक केली आणि त्याला परदेशात पाठवले. सध्या उमेश युरोपमध्ये अडचणीत असून त्याने व्हाट्सअप व्हिडीओद्वारे मदतीची कळकळीत विनंती केली आहे.
कंपनीने खोटे आरोप लावून कामावरून काढले
तो तरुण व्हिडीओमध्ये म्हणतोय की, “एका एजंटने मला युरोपमध्ये आणलं आणि फसवलं. त्याने कोणतीही मदत केली नाही. एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये आमचे मेडिकल इन्शुरन्स का काढले नाही असं मी त्यांना विचारलं. त्यावर त्यांनी खोटी माहिती दिली. आमचे कोणतेही मेडिकल इन्शुरन्स काढलं नाही. नंतर माझ्यावर खोटे आरोप लावून नोकरीवरुन काढण्यात आलं. माझी मदत करा.”
एजंट्सकडून जीवे मारण्याच्या धमक्या
मनसेच्या तुलसी जोशी यांना केलेल्या व्हिडीओमध्ये तो तरुण म्हणतोय की, “प्रामाणिक काम करुनही मला नोकरीवरून काढण्यात आलं. माझा मानसिक छळ केला जातोय. इथल्या एजंट्सकडून धमक्या दिल्या जात आहेत. मला गायब करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या ठिकाणी काहीच मदत मिळत नाही. मला आता काय करायचं हेच समजत नाही. मला काहीही करून मदत करा, मला देशात परत यायचं आहे.”
परदेशात जाणाऱ्या तरुणांनी काळजी घ्यावी
या प्रकारामुळे परदेशात नोकरीच्या शोधात जाणाऱ्या तरुणांना योग्य माहिती आणि खात्रीशीर एजंटची निवड करण्याचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले. उमेशच्या मदतीसाठी प्रशासन आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे.