सैफच्या मणक्यात आढळला अडीच इंचाचा चाकूचा तुकडा, काय म्हणाले डॉक्टर ?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला झाला असून लिलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात प्रवेश केला आणि त्याने अभिनेत्यावर हल्ला केला. आरोपीने सैफवर चाकूने सहा वार केले आहेत. आता लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करून त्याच्या मणक्यातून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आलं आहे.

“सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. त्याच्यावरील न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी पूर्ण झाली आहे. सैफला ऑपरेशन थिएटरमधून आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. एक दिवस त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर डिस्चार्जबद्दल निर्णय घेऊ. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो लवकरच बरा होईल. सैफवरील दोन जखमा खोलवर असून दोन मध्यम स्वरुपाच्या जखमा आहेत. तर दोन खरचटलेल्या स्वरुपाच्या जखमा आहेत. त्याचप्रमाणे अडीच इंचाचा चाकूचा तुकडा आम्ही त्याच्या मणक्यातून काढला आहे,” अशी माहिती लिलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमणी यांनी दिली.

तर सैफवर शस्त्रक्रिया केलेले न्यूरोसर्जन नितीन डांगे म्हणाले, “सैफ अली खानला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफच्या मणक्याला जबर दुखापत झाली होती. त्याच्या मणक्यात चाकूचा तुकडा घुसला होता. तो तुकडा काढण्यासाठी आम्ही सर्जरी केली आणि स्पायनल फ्लुएडचं लीकेज थांबवण्यासाठी उपचार करण्यात आले. त्याच्या डाव्या हातावर दोन खोलवर जखमा होत्या. त्याचसोबत मानेवरील जखमेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. सैफची प्रकृती आता स्थिर आहे. तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून त्याच्या प्रकृतीला आता धोका नाही.”

सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरात दबा धरून बसली होती, अशीही माहिती समोर येत आहे. रात्री दोन वाजता त्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सुरू असल्याचा आवाज सैफला आला. हा आवाज ऐकून तो बाहेर आला, तेव्हा चोराने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का? याचा पोलीस तपास करत आहेत.

पहा व्हिडिओ:

 

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *