मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) च्या प्रदर्शनादरम्यान एका थिएटर कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याने बिलावरून झालेल्या वादात एका व्यक्तीच्या कानाला चावा घेतला. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, ग्वाल्हेरच्या फलका बाजार भागातील काजल टॉकीजमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली. मध्यंतरादरम्यान, गुडा गुडी नाका येथील रहिवासी पीडित शब्बीर खान आणि कॅन्टीन कर्मचारी राजू, चंदन आणि एम.ए. खान यांच्यात नाश्ता आणि इतर अल्पोपहाराच्या रकमेवरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.
यादरम्यान कॅन्टीन कर्मचाऱ्यांच्या एका सदस्याने शब्बीर खानचा कान चावला. यामुळे पीडित तरुणाला रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. खान यांच्या कानाला आठ टाके टाकून किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यानंतर खान यांनी इंदरगंज पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आणि वैद्यकीय अहवालाचीही दखल घेतली. आयपीसी कलम 294, 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 34 (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याची तुलना चित्रपटाच्या शेवटच्या स्टंट सीक्वेन्सशी करण्यात आली. जिथे अल्लू अर्जुनचे हात पाय बांधण्यात आले होते. त्यानंतर तो केवळ आपला डोक्याच्या साहाय्याने आणि चावा घेत त्याच्या पुतणीची गुंडांना तावडीतून सुटका करतो.